पुणे : ‘कोणताही देश लष्करी सामर्थ्याशिवाय प्रगती साध्य करू शकत नाही,’ असे सांगून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘बदलती भू-राजकीय परिस्थिती आणि युद्धाच्या स्वरुपाचा विचार करून सशस्त्र दलांना अत्याधुनिक शस्त्रांसह सुसज्ज करून आधुनिक युद्धासाठी सक्षम करण्यात येत आहे,’ असे स्पष्ट केले.
लष्कर दिनानिमित्त खडकी येथील बॉम्बे इंजिनीअर ग्रुप येथे झालेल्या ‘गौरवगाथा’ या कार्यक्रमात सिंह बोलत होते. संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ उपस्थित होते.
हेही वाचा >>>‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
सिंह म्हणाले, ‘विकसनशील देशापासून विकसित देशाकडे प्रगती करत असताना समाजातील प्रत्येक घटकाने योगदान दिले पाहिजे. मात्र, सुरक्षा यंत्रणा अभेद्य असेल आणि देशाच्या सीमा सुरक्षित असतील, तेव्हाच हे योगदान सार्थकी लागेल. भारताने नेहमीच युद्धापेक्षा बुद्धाला प्राधान्य दिले आहे. मात्र, शांतता ही कमजोरीचे लक्षण नसून, ती शक्तीचे प्रतीक आहे, हे भारतीय सैन्याने दाखवून दिले आहे. आधुनिक शस्त्रांसह अग्निवीरच्या माध्यमातून लष्करात युवा जोशही आला आहे. सशस्त्र दलांमध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे. महिला दुर्गम, अवघड क्षेत्रात कार्यरत आहेत.’
‘येत्या काळात युद्ध आणि संघर्ष अधिकाधिक हिंसक आणि अनिश्चित होत जाणार आहे. त्याशिवाय, अराष्ट्रीय घटकांमुळे गंभीर चिंता निर्माण होत आहे. त्यामुळे सैन्याने व्यापक क्षमतानिर्मिती आणि सुधारणांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सायबर आणि अवकाश क्षेत्र हे नवीन युद्धक्षेत्र म्हणून उदयाला येत आहे. गेल्या आर्थिक वर्षात देशांतर्गत संरक्षण उत्पादनाने विक्रमी १.२७ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला, तर दशकभरापूर्वी सुमारे दोन हजार कोटी रुपये असलेली संरक्षण सामग्री निर्यात २१ हजार कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे,’ असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
‘भारत रणभूमी दर्शन ॲप’चे अनावरण
सर्वसामान्य नागरिकांना आता सियाचीनपासून गलवान ते डोकलामपर्यंतच्या विविध युद्धभूमीला प्रत्यक्ष भेट देता येणार आहे. त्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘भारत रणभूमी दर्शन ॲप’चे अनावरण संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून युद्धभूमीला भेट देऊन त्याविषयी जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.
उत्कृष्टता केंद्राचे भूमिपूजन
लष्कराच्या पॅरा ॲथलिट्ससाठीच्या ‘आर्मी पॅरा नोड’ या उत्कृष्टता केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून पॅरा ॲथलिट्ससाठीच्या सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
भारतीय सैन्याची ‘गौरवगाथा’
भारतातील प्राचीन काळातील युद्ध ते आधुनिक काळातील युद्धे, या दरम्यान बदलत गेलेल्या योद्ध्याचा प्रवास गौरवगाथा कार्यक्रमातून उलगडण्यात आला. या वेळी हेलिकॉप्टर्स, ग्लायडर्सनी सलामी दिली. कार्यक्रमात ध्वनी-प्रकाशासह पारंपरिक लढाईची प्रात्यक्षिके, वेगवान वाहने, रणगाडे, जवानांनी प्रत्यक्ष केलेले युद्धप्रसंगांच्या सादरीकरणामुळे उपस्थितांना थरार अनुभवता आला. त्यामुळे भारतीय सैन्याच्या वाटचालीची माहिती देणारा गौरवगाथा कार्यक्रम उपस्थितांची दाद मिळवणारा ठरला.