पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वादग्रस्त प्रस्तावांवर अभ्यास करण्याचे कारण देत सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने आठ दिवसांसाठी लांबणीवर टाकलेली सभा गुरुवारी (दि. २७) होणार आहे. त्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी आठ दिवसांसाठी सभा तहकूब करण्याची सूचना मांडली होती, त्यास पक्षनेते मंगला कदम यांनी अनुमोदन दिल्यानंतर २७ जूनपर्यंत सभा लांबणीवर टाकल्याची घोषणा महापौर मोहिनी लांडे यांनी केली होती. त्यानुसार, गुरुवारी ही सभा होत आहे.
बीआरटी नियमावलीत फेरबदल करणे, पूररेषेत टीडीआर देण्याबाबतच्या नियमात फेरबदल करणे, जुन्या हद्दीत पूररेषेची आखणी व त्यादृष्टीने नवीन नियम तयार करणे, प्रस्तावित टाऊनशिपसंदर्भात धोरण ठरवणे, पालिकेच्या मिळकती भाडय़ाने देण्यासाठीचे नियम तयार करणे, असे महत्त्वपूर्ण विषय सभेपुढे आहेत. बिल्डर लॉबीच्या फायद्याचे विषय मंजूर करण्यासाठी राष्ट्रवादीचा आटापिटा सुरू आहे. याशिवाय, ‘एचबीओटी’ मशीन खरेदी व झोपडपट्टय़ांविषयीचे लेखी प्रश्न सभेत असून ते सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने अडचणीचे आहेत.