पुणे : ‘पीएमपीएमल’च्या संचलनातील तूट गेल्या दहा वर्षांत सात पटींनी वाढून ७६६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. महापालिकेने केलेल्या लेखापरिक्षणामधून ही माहिती समोर आली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुणे महानगर परिवहन (पीएमटी) आणि पिंपरी-चिंचवड महानगर परिवहन (पीसीएमटी)चे विलीनीकरण करून पुणे महानगर परिवहन महामंडळ कंपनी (पीएमपीएमएल) स्थापन करण्यात आली. मात्र, त्यानंतरही पीएमपीचा तोटा कमी होण्याऐवजी त्यामध्ये वाढच होत आहे.
दोन्ही शहरातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करुन देणे तसेच तीन वर्षांमध्ये स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे राहून आपला संपूर्ण खर्च भागविणे हे उद्दिष्ट पीएमपीच्या स्थापनेवेळी ठेवण्यात आले होते.
कारभार सुरळीत चालावा यासाठी पीएमपीला दरवर्षी येणाऱ्या एकूण संचलन तुटीमधील ६० टक्के रक्कम पुणे महापालिकेने, तर उर्वरित ४० टक्के तूट पिंपरी-चिंचवड महापालिकेने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुरुवातीच्या काळात तीन वर्षांसाठीच ही रक्कम दिली जाणार होती.
तुटीची रक्कम देऊनही पहिल्या तीन वर्षांमध्ये पीएमपी कंपनी सक्षम न झाल्याने पुढील काही वर्षे याच पद्धतीने दोन्ही महापालिकेच्या वतीने पीएमपीला तुटीची दिली जात आहे.
‘पीएमपीएमएल’च्या स्थापनेनंतर २०१३-१४ मध्ये संचलन तूट ९९.४० कोटी होती. यात दहा वर्षात सात पटींनी वाढ होऊन २०२३-२४ मध्ये ७०६ कोटी ३५ लाखांवर गेली, तर २०२४-२५ या वर्षांमध्ये ६० कोटींनी वाढ झाली. आता ही तूट ७६६ कोटींपर्यंत पोहचली आहे.
पीएमपी कंपनीने या संचलनातील तुटीचा अहवाल महापालिकेला पाठविला होता. त्याचे लेखापरीक्षण करण्यात आले असून, शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत हा अहवाल मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे.
पीएमपीला संचलनातील तुटीपैकी ६० टक्के रक्कम देण्याची जबाबदारी पुणे महापालिकेवर असल्याने ही रक्कम महापालिकेला द्यावी लागणार आहे. त्यामुळे पुणेकरांवर खर्चाचा भार वाढणार आहे.
ही आहेत तुटीची कारणे
– सेवक वर्गावर होणारा वेतनाचा खर्च
– बस भाडे, विद्युत खर्च यामध्ये झालेली वाढ
तूट कमी करण्यासाठी उपाययोजना
– तिकिटांची तसेच पास विक्रीमध्ये वाढ व्हावी.
– तिकीटविक्रीतील गळती, विविध सवलतींचे दिले जाणारे पास, प्रवासी संख्या वाढविण्यासाठी आवश्यक प्रयत्न
– ज्या मार्गावर अधिक प्रवासी संख्या आहे. तेथे अधिकाधिक बस उपलब्ध करणे
– तज्ज्ञ सल्लागाच्या मदतीने मार्गांची फेररचना करावी.
– जाहिरातीचे सुसंगत धोरण ठरवून बस आणि बसस्टॉपवर जाहिराती कराव्यात.
– भाड्याने दिलेल्या गाळ्यांचे भाडेकरार नव्याने करावेत.
– जुन्या बसबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.
– तिकीट तपासणी पथक सक्षम करावे.
पीएमपी संचलनातील तूट
वर्षे तूट
२०१४-१५ १६७.६८
२०१५-१६ १५१.८०
२०१६-१७ २१०.४४
२०१७-१८ २०४.६२
२०१८-१९ २४७.०४
२०१९-२० ३१५.१०
२०२०-२१ ४९४.१६
२०२१-२२ ७१८.९७
२०२२-२३ ६४६.५३
२०२३-२४ ७०६.८०
२०२४-२५ ७६६. ८६