देहू, आळंदी, हिंजवडी, गहुंजे, चाकणसह पिंपरी पालिकेच्या हद्दीलगतची २० गावे नव्याने महापालिकेत समाविष्ट करण्याचा राज्य शासनाचा विचार असून मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत याबाबतची सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार, राज्य शासनाने महापालिकेकडे याबाबतची विचारणा केली असून याबाबतचा अभिप्राय मागवला आहे.
पिंपरी पालिकेत ११ सप्टेंबर १९९७ ला हद्दीलगतची १४ गावे समाविष्ट करण्यात आली होती.  त्यानंतर, २० गावांचा समावेश करण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे. देहू, विठ्ठलनगर, म्हाळुंगे, निघोजे, मोई, कुरुळी, नाणेकरवाडी, खराबवाडी, चाकण, कडाची वाडी, चिंबळी, केळगाव, आळंदी, खालुंब्रे, गहुंजे, हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे या गावांचा त्यात समावेश आहे. या संदर्भात राज्य शासनाची वरिष्ठ पातळीवर बैठक झाली. त्यावेळी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.
आयुक्तांनी राज्य शासनाच्या प्रस्तावाची माहिती महापौर मोहिनी लांडे व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी एका बैठकीत दिली. शहर सुधारणा समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येणार असून त्यानंतर पालिका सभेची मान्यता घेण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी उपमहापौर राजू मिसाळ, पक्षनेत्या मंगला कदम, काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते कैलास कदम, शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे, मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे, विधी समितीचे सभापती वैशाली जवळकर, क्रीडा समितीचे सभापती रामदास बोकड आदी उपस्थित होते. देहू व आळंदी ही तीर्थक्षेत्रे असून हिंजवडी आयटीचे केंद्र तर चाकण औद्योगिक पट्टा आहे. सध्या पालिकेचे क्षेत्र १७७ चौ. कि.मी. असून ही गावे समाविष्ट झाल्यास मोठय़ा प्रमाणात हद्दवाढ होणार आहे. चाकणचे नियोजित विमानतळ पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ येणार आहे. तथापि, यावरून बरेच काही राजकारण होण्याचे संकेत आहेत.