देहू नगरीत आज पासून पुन्हा एकदा मांस आणि मच्छी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसा ठराव नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आला आहे. याअगोदर देहूत ग्रामपंचायत असताना मांस आणि मच्छीवर बंदी होती. परंतु, मध्यंतरी निवडणूका लागल्या आणि त्यादरम्यान प्रशासक नेमण्यात आले तेव्हा देहू नगरीत मांस आणि मच्छी विक्री जोरात सुरू होती.
मात्र आता ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत होताच पूर्वीचा मांस आणि मच्छी बंदीचा निर्णय एक मताने घेण्यात आला आहे, अशी माहिती देहूचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी दिली आहे.
तुकोबांच्या देहू नगरीत मांस आणि मच्छीवर बंदी होती. पण नगरपंचायच्या निवडणूका येताच देहूत प्रशासक नेमण्यात आले होते, तसेच करोनाच्या काळात मांस आणि मच्छीची विक्री देहूत पाहण्यास मिळत होती. नगरपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडली असून फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत देहू नगरपंचायत हद्दीत मांस आणि मच्छीवर बंदी घालवी असा एक मताने ठराव करण्यात आला आहे. या नियमांच पालन न केल्यास संबंधित व्यक्तीवर पोलीस कारवाई केली जाणार असल्याची माहिती देहूचे मुख्याधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना दिली आहे.