पिंपरी : जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याचे औचित्य साधून जगातील सर्वांत मोठ्या पगडीचे लोकार्पण मंगळवारी (१० मार्च) देहूत पार पडणार आहे. पगडीचा घेराव हा २२ फुटांचा असून, उंची ४ फूट आहे. या पगडीची ‘वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया ॲन्ड जिनिअस’मध्ये नोंद होणार आहे.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरात सकाळी ११ वाजता हा सोहळा होणार आहे. या प्रसंगी वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया ॲन्ड जिनिअस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनकुमार सोलंकी, संत तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम मोरे उपस्थित राहणार आहेत. दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांनी याचे आयोजन केले आहे.

दिलीप सोनिगरा म्हणाले, ‘संत तुकाराम महाराज यांच्यावर नितांत श्रद्धा, प्रेम, स्नेह आहे. याच भावनेतून जगातील सर्वात मोठी पगडी तयार केली आहे. वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया ॲन्ड जिनिअस बुकमध्ये पगडीची नोंद होणार आहे. ही पगडी दर्शनासाठी सर्वांना खुली आहे’.

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे चरित्र दीपस्तंभ प्रमाणे

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे चरित्र म्हणजे दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे ज्ञानेश्वर महाराज कदम यांनी म्हटले आहे.  तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाला येत्या १६ मार्च रोजी अर्थात तुकाराम बीजेच्या दिवशी ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यामध्ये रोज दुपारी संत तुकाराम महाराज चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्ञानेश्वर महाराज कदम यांनी तुकोबारायांचे चरित्र कोणी कोणी लिहिले यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘संत बहिणाबाईंनी सुद्धा तुकोबारायांचे चरित्र लिहिले आहे. खरे तर त्यांची आणि तुकोबारायांची तोपर्यंत भेट झाली नव्हती ; परंतु संत बहिणाबाईंची भक्ती पाहून तुकोबारायांनी त्यांना स्वप्नात काही दृष्टांत दिले होते. त्यावरून त्यांनी त्यांच्या अभंगात तुकोबारायांचे चरित्र मांडले आहे. तुकोबारायांचे अत्यंत सविस्तर आणि भक्ती भावाने श्रद्धेने चरित्र लिहिले आहे ते म्हणजे महिपती महाराज यांनी, त्यात त्यांच्या जीवनातील बहुतेक प्रसंग विस्ताराने वर्णन केले आहेत. संतांचे चरित्र दीपस्तंभ प्रमाणे कार्य करत असते.  संतांचे चरण आणि आचरण दोन्ही अनुकरणीय असतात’.

Story img Loader