जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ३३८ वा पालखी प्रस्थान सोहळा आज दुपारी दोनच्या सुमारास पार पाडणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक देहूत दाखल होत आहेत. पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करताना वारकरी पाहायला मिळाले.

हेही वाचा – पुणे : पलटी झालेले चारचाकी वाहन वसंत मोरेंनी केले बाजूला, काही मिनिटांत नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका

पालखी प्रस्थानाची सुरुवात पहाटेपासूनच विधिवत पूजेने झाली आहे. मुख्य मंदिरासह तुकोबांच्या शिळा मंदिरावर आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे. वर्षांमध्ये एकदा येणाऱ्या पालखी सोहळ्याचे वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात. मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग आषाढी वारीसाठी घरातून बाहेर पडतो. जून सुरू होऊनदेखील अद्याप पाऊस पडलेला नाही, त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पाऊस पडावा असं साकडं सध्या तुकोबा चरणी घालताना वारकरी बघायला मिळतात. टाळ-मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकारामाचे गजर करत एक-एक पाऊलवाट तुडवत वारकरी पंढरीच्या दिशेने आज वाटचाल करणार आहे.