पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी (१४ जून) देहूत दाखल होणार आहेत. त्यांच्या हस्ते शिळा मंदिर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर ते वारकरी संप्रदायाला संबोधित करतील. त्याअगोदर देहू संस्थानच्या विश्वस्तांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्वच तिर्थक्षेत्रांचा विकास व्हावा, संतांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, वक्तव्य केली जातात त्यासंदर्भात कायदा करावा यासह इतर अपेक्षा देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूत शिळा मंदिर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी देहू सज्ज झाली आहे. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास मोदी देहूत दाखल होतील. शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर ते वारकरी संप्रदायाला संबोधित करतील.
मोदी देहूत दाखल होण्यापूर्वी देहू संस्थानने काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. माणिक महाराज मोरे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून वारकरी संप्रदायाला खूप अपेक्षा आहेत. पालखी सोहळा, आषाढी कार्तिकीचं नियोजन कुंभमेळ्याच्या धर्तीवर व्हावं, पालखी मार्ग होतायेत, त्याच्या दुतर्फा झाडे लावावीत जेणेकरून वारकऱ्यांना विसाव्यासाठी सावली मिळेल.”
हेही वाचा : पंतप्रधान मोदींसाठी तयार केलेल्या ‘तुकाराम पगडी’वरील ‘त्या’ ओवींमध्ये बदल; नेमकं काय झालं?
“महाराष्ट्रातील सर्वच तिर्थक्षेत्राचा शासकीय पातळीवर विकास व्हावा, याला सर्वांनी सहकार्य करावे. या अपेक्षा पंतप्रधान मोदी पूर्ण करतील,” असं देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी म्हटलं. संजय महाराज मोरे म्हणाले, “देहूतील इंद्रायणी स्वच्छ व्हावी, गंगेचं ज्या प्रकारे काम सुरू आहे तसं इंद्रायणीचं व्हावं.”