पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाकडून साडेपाच हजारांहून अधिक सदनिकांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. सदनिकांच्या विक्री पद्धतीत मानवी हस्तक्षेप होऊ नये, पारदर्शक आणि सुलभ प्रक्रियेसाठी इंटिग्रेटेड लॉटरी मॅनेजमेंट सिस्टीम (आयएलएमएस २.०) या नव्या संगणक प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. मात्र, स्वयंचलित पद्धतीत कागदपत्रांची निश्चितता करण्यासाठी दीर्घ कालावधी लागत असल्याच्या तक्रारी अर्जदारांकडून येत आहेत.
म्हाडाच्या राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पांतील सदनिकांची विक्री अर्ज करण्यापासून ते सदनिकेचा ताबा मिळेपर्यंत आयएलएमएस २.० या नव्या संगणक प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोडत आज्ञावली प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेप विरहीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे म्हाडाकडून सांगण्यात येत आहे. प्रचलित पद्धतीनुसार अर्जदारांना यशस्वी झाल्यानंतर २१ प्रकारची कागदपत्रे द्यावी लागायची. या कागदपत्रांची छाननी प्रक्रिया, पडताळणी आदींसाठी मनुष्यबळ आणि कालावधी लागत असे. ही प्रक्रिया टाळून नवीन प्रणालीत अर्जदारांना अर्ज भरताना छायाचित्र, ई-स्वाक्षरी, शपथपत्र, अधिवास प्रमाणपत्र, स्वीकृतीपत्र, उत्पनाचा दाखला, आधार-पॅनकार्ड आदी सात कागदपत्रे आज्ञावलीनुसार संगणकीकृत केल्याशिवाय अर्जाची प्रक्रिया पूर्ण होणार नसल्याचे निकष टाकण्यात आले आहेत.
पुणे मंडळाच्या सोडतीसाठी ५ जानेवारीपासूनच अर्ज भरण्यास सुरुवात झाली. मात्र छायाचित्र किंवा इतर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर चार-पाच दिवसांचा कालावधी उलटून गेला, तरी पडताळणी प्रक्रियेसाठी विलंब लागत असल्याच्या तक्रारी आहेत. कागदपत्रांची पूर्तता करून चार दिवस झाले, मात्र अद्याप छायाचित्र पडताळणीसाठीची प्रक्रिया रखडली आहे, जी प्रक्रिया २४ तासांपर्यंत मर्यादित आहे, त्यामुळे खूप विलंब लागत असल्याची तक्रार अर्जदार योगेश कराळे यांनी केली.
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आयएलएमएस २.० ही प्रणाली तयार करण्यात आली असून पुणे मंडळाच्या सोडतीमध्ये प्रथमच अवलंब करण्यात आला आहे. नूतन प्रणाली असल्याने त्रुटी दूर करण्यासाठी प्रणाली तयार करणारे माहिती तंत्रज्ञान विभागाचे अभियंता यांच्यासोबत बैठक घेण्यात आली आहे. त्रुटी दूर करण्यासाठी लवकरच निर्णय घेऊन अर्जदारांना दिलासा देण्यात येईल, असे म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी सांगितले.
हेही वाचा – पुणे: शाळांना सीबीएसई मान्यतेची बनावट प्रमाणपत्र प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल
नव्याने अवलंब करण्यात आलेल्या प्रणालीत कागदपत्रांच्या पडताळणीत विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आधार क्रमांक पडताळणी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (यूआयडीएआय) पडताळले जाते. अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) यूटीआयच्या डाटा बेसवर, तर पॅनकार्डची स्वतंत्र यंत्रणेकडून पडताळणी केली जात आहे. हा विलंब दूर करण्यासाठी लवकरच निर्णय घेऊन यंत्रणा सुलभ करण्यात येईल, असे जितेंद्र जोशी, अभियंता, आयएलएमएस २.० प्रणाली यांनी सांगितले.