संजय जाधव, लोकसत्ता

पुणे : सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाइम चित्रपटगृह उड्डाणपूल उभारणीचे काम महापालिकेकडून सुरू आहे. हा उड्डाणपूल संपून खाली उतरत असलेल्या मार्गांमध्ये मेट्रो मार्गाचे खांब येत आहेत. असे एकूण मेट्रोचे ३९ खांब असणार आहेत. या खांबांची उभारणी करण्यासाठी त्यांच्या रचनेचा अहवाल महामेट्रोकडून अनेक महिने पाठपुरावा करूनही महापालिकेला मिळालेला नाही. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामाला विलंब होत आहे, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

महापालिकेकडून उड्डाणपूल उभारणी करण्याआधी महामेट्रोकडून तेथून जाणाऱ्या मेट्रो खांबांच्या रचनेचा अहवाल मागविण्यात आला होता. उड्डाणपूल संपून जिथून खाली उतरेल त्या मार्गांमध्ये येणारे मेट्रोचे खांब जमिनीपासून १ मीटर उंचीपर्यंत महापालिका उभारणार आहे. याबाबत महापालिकेने २१ नोव्हेंबर २०२२ रोजी महामेट्रोकडून या खांबाची रचना कुठे आणि कशी असेल, याचा आराखडा मागविला होता. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर यंदा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला या खांबांच्या रचनेचा अहवाल देण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा-प्रेमप्रकरणातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अखेर याबाबत २७ सप्टेंबरला महापालिका आणि महामेट्रो यांची संयुक्त बैठक झाली. त्या वेळी महामेट्रोने दिलेला खांबांच्या रचनेचा अहवाल भूगर्भ तपासणीविनाच दिल्याचे समोर आले. तेव्हापासून पुन्हा महापालिकेकडून महामेट्रोकडे सुधारित अहवालासाठी पाठपुरावा केला जात आहे. तरीही महामेट्रोचे अधिकारी हा अहवाल देण्यास विलंब लावत आहेत. उड्डाणपूल उतरण्याच्या ठिकाणचे मार्ग तयार नसल्याने उड्डाणपुलाच्या उभारणीला विलंब होत आहे. उड्डाणपूल उभारणीचे साहित्य लिफ्टच्या सहाय्याने पुलावर नेऊन सध्या काम सुरू आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

उड्डाणपूल मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कामाला होत असलेल्या विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च महिन्याला सुमारे एक कोटी रुपयांनी वाढत आहे. याचबरोबर कामही १०० टक्के क्षमतेने होण्याऐवजी ८० टक्के क्षमतेनेच करता येत आहे. मेट्रोची खांब उभारणी सुरू केल्याशिवाय उड्डाणपूल खाली उतरणार असलेल्या मार्गांचे काम सुरू करता येत नाही. महामेट्रोकडून खांबांच्या रचनेचा अहवाल न मिळाल्याने कामाला विलंब होत आहे, असेही सूत्रांनी नमूद केले.

आणखी वाचा-विमाननगर भागात ऑनलाइन वेश्याव्यवसाय… परराज्यातील दोन तरुणी ताब्यात

उड्डाणपूल संपून खाली उतरण्याच्या मार्गांमध्ये महामेट्रोचे ३९ खांब येत आहेत. महापालिकेकडून वारंवार मागणी करून या खांबाच्या रचनेचा अहवाल महामेट्रोकडून मिळालेला नाही. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामाला विलंब होत आहे. -अजय वायसे, कार्यकारी अभियंता, महापालिका

महामेट्रोने ३९ पैकी १२ खांबांच्या रचनेचे अहवाल महापालिकेला दिले आहेत. टप्प्याटप्प्याने इतर खांबांच्या रचनेचे अहवाल महापालिकेला दिले जातील. आमच्याकडून महापालिकेला सहकार्य केले जात आहे. -हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो

Story img Loader