पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शैक्षणिक विभागांनी घेतलेल्या सत्र परीक्षेच्या निकालाची रखडपट्टी झाली आहे. अंतर्गत आणि बाह्य मूल्यमापनाच्या मूल्यांकन पद्धतीच्या अनिश्चिततेचा फटका निकालांना बसला असून, आता नव्या परिपत्रकामुळे निकाल तयार केलेल्या विभागांवर पुन्हा नव्याने निकाल तयार करण्याची वेळ आली आहे.

विद्यापीठातील विभागांमध्ये आतापर्यंत ५० टक्के गुण अंतर्गत मूल्यमापन आणि ५० टक्के गुण बाह्य मूल्यमापनाला अशी ५०ः५० मूल्यांकन पद्धती लागू होती. गेल्यावर्षी ही पद्धती बदलून ७०:३० मूल्यांकन पद्धत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. या वर्षी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर पुन्हा ७०:३० मूल्यांकन पद्धत लागू करण्याबाबतची सूचना देण्यात आली. त्याला विद्यापीठातील शैक्षणिक विभागांनी विरोध केला होता. त्यानंतर विद्यापीठातील विभागांमध्ये हिवाळी परीक्षा झाल्या. मूल्यांकन पद्धती निश्चित नसल्याने निकाल प्रलंबित राहिले आहेत. २४ जानेवारीच्या परिपत्रकाद्वारे विद्यापीठातील विभागांना ५०:५० मूल्यांकन पद्धत लागू करण्यास मान्यता देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, काही विभागांनी पूर्वीच्या आदेशानुसार ७०:३० मूल्यांकन पद्धतीनुसार निकाल तयार करण्याची प्रक्रिया राबवली होती.

या पार्श्वभूमीवर, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, विद्यापीठातील शैक्षणिक विभागांतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना ५०:५० मूल्यांकन पद्धती शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच विद्यापीठ अधिकार मंडळाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयानुसार विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था, विद्यापीठ विभागातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून आणि पदवी अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करण्यात आले आहे. त्यानुसारच्या मूल्यांकन पद्धतीनुसार प्रत्येक विषयाच्या अंतर्गत व बहिःस्थ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येकी ४० टक्के गुण आणि एकूण गुणांच्या ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. या अनुषंगाने संबंधित पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सत्र एकच्या ऑक्टोबर २०२४ च्या परीक्षांचे निकालपत्रक निश्चित केलेल्या मूल्यांकन पद्धतीनुसार परीक्षा विभागाकडे सादर किंवा फेरसादर करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, ७०:३० मूल्यांकन पद्धतीनुसार निकाल तयार करण्याची प्रक्रिया राबवलेल्या विभागांना आता नव्याने निकाल तयार करावा लागणार आहे. मूल्यांकन प्रक्रियेच्या अनिश्चिततेमुळे निकालाला उशीर झाला आहे. तसेच ४५ दिवसांत निकाल जाहीर करण्याच्या नियमाचेही उल्लंघन झाल्याचे काही प्राध्यापकांनी निदर्शनास आणून दिले.

Story img Loader