चांगली माणसे राजकारणात येत नाही, आली तरी निवडून येऊ शकत नाहीत. आता तर कामही पाहिले जात नाही. फक्त पैसा पाहिला जातो. बदल हवा म्हणून दिल्लीकरांनी ‘आप’ला कौल दिला, आता देशही तशाच बदलाची वाट पाहतोय, असे प्रतिपादन लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांनी चिंचवड येथे केले. धंदा न करता श्रीमंत व्हायचे असल्यास मंत्री व्हावे लागते, अशी टिपणी त्यांनी केली.
रोटरी क्लब चिंचवड आयोजित शिशिर व्याख्यानमालेचे उद्घाटन जोशी यांच्या हस्ते झाले, तेव्हा ‘मराठी तरुणांनो उद्योजक व्हा’ या विषयावर ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष गणेश कुदळे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, बाळासाहेब भापकर आदी उपस्थित होते. जोशी म्हणाले, उद्योग-व्यवसाय करण्यासाठी पैसा लागत नाही, डोके लागते. पैशाने पैसा वाढतो. पैशाने काहीही मिळत, कोणतीही गोष्ट विकत घेता येते. श्रीमंती उपभोगण्यासाठी गरिबीची जाणीव असावी लागते. श्रीमंत होण्यासाठी स्वप्ने पडली पाहिजेत. ज्याला स्वप्ने पडत नाही, तो आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. मोठय़ा भावामुळे उद्योगात आलो व यशस्वी झालो. मुंबईतील सर्वात उंच ५२ मजली इमारत आपल्या मालकीची आहे, हे डोळ्यासमोरचे उदाहरण असल्याचे जोशींनी नमूद केले.
यशस्वी होण्याचे ‘सूत्र’
माधुकरी मागून दिवस काढत इथपर्यंतचा प्रवास केल्याचे सांगत मनोहर जोशी यांनी यशस्वी होण्यासाठीचे ‘सूत्र’ सांगितले. नकारार्थी भावना ठेवू नका, ‘द्या’ आणि ‘घ्या’ हे तत्त्व पाळा, स्वत:च्या पैशाने व्यवसाय करू नका, छोटे उद्योग न करता मोठेच करा, एका वेळी एकच व्यवसाय करू नका, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, मोठी स्वप्ने पाहा, थोरा-मोठय़ांची आत्मचरित्रे वाचा, स्वत:ची विश्वासार्हता निर्माण करावी, अशा टिप्स त्यांनी दिल्या.
दिल्लीप्रमाणे देशही बदलाची वाट पाहतोय – मनोहर जोशी
चांगली माणसे राजकारणात येत नाही, आली तरी निवडून येऊ शकत नाहीत. आता तर कामही पाहिले जात नाही. फक्त पैसा पाहिला जातो. बदल हवा म्हणून दिल्लीकरांनी ‘आप’ला कौल दिला.
First published on: 17-01-2014 at 03:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi change nation manohar joshi entrepreneur politics