पुणे कोल्हापूर लोहमार्गावरून धावणारी हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस ही अति जलद धावणारी रेल्वे आता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जेजुरी रेल्वे स्थानकात अल्पवेळ थांबणार आहे, अशा प्रकारचे नियोजन रेल्वे प्रशासनातर्फे सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वे विभाग व्यवस्थापक धर्मवीर मीना, पुणे विभाग व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, पुणे आरपीएफच्या प्रियंका शर्मा यांनी  दिली .

श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबाच्या देवदर्शनासाठी राज्यातील भाविकांबरोबरच इतर राज्यातून अनेक भाविक येतात परंतु रेल्वे स्थानकावर सर्व गाड्या थांबत नसल्याने भाविकांची गैरसोय होती. रेल्वे स्टेशन परिसरातील स्थानिक  कार्यकर्त्या माजी नगरसेविका आमीना  पानसरे, रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय खोमणे, गणेश आबनावे व ग्रामस्थांनी

निजामुद्दीन एक्सप्रेसला जेजुरीत थांबा मिळावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली आहे. जेजुरी हे तीर्थक्षेत्र आहेच ,परंतु या ठिकाणी औद्योगिक वसाहत असल्याने ही गाडी थांबण्याचा उद्योजकांनाही चांगला फायदा होणार आहे .

सध्या पुणे ते कोल्हापूर लोहमार्गावर धावणारी सह्याद्री एक्सप्रेस पुढील महिन्यापासून मुंबईपर्यंत धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली या लोहमार्गावरील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच आळंदी (म्हातोबाची)  या रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी जेजुरीतील कार्यकर्त्यांच्या शिष्ट मंडळाने त्यांची भेट घेऊन चर्चा केली.

जेजुरी हे तीर्थक्षेत्र असल्याने महत्त्वाचे ठिकाण आहे. रेल्वे स्थानकापासून 14 किलोमीटर अंतरावर अष्टविनायकातील मोरगावचा गणपती आहे. खंडोबाच्या दर्शनासाठी प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र ,तेलंगणा ,राजस्थान, गुजरात येथून भाविक मोठ्या प्रमाणात येतात ,मात्र या ठिकाणी सर्व गाड्या थांबत नसल्याने भाविकांना इतर खाजगी गाड्यांचा वापर करावा लागतो.

या मार्गावरून वंदे भारत ,दिल्ली -गोवा जोधपुर- मंगळूर कोल्हापूर -अहमदाबाद, महालक्ष्मी, लोकमान्य नगर- हुबळी ,यशवंतपूर -हुबळी अशा अनेक लांब पल्ल्याच्या अति जलद रेल्वे गाड्या धावतात मात्र जेजुरीत त्यांना थांबा नाही. यामुळे भाविकांची ,औद्योगिक वसाहती मधील कामगारांची अत्यंत गैरसोय होते .या ठिकाणी सर्वच लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवाव्यात अशी मागणी येथील लोकप्रतिनिधींची आहे.

रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन आता हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसला जेजुरी थांबा मंजूर केला आहे. या निर्णयाचे जेजुरी व औद्योगिक वसाहतीमध्ये स्वागत करण्यात आले आहे. जेजुरी पासून रेल्वे स्थानक अडीच किलोमीटर अंतरावर असून रेल्वे गाडीने पुणे ,मुंबई ,कोल्हापूर आदी भागातून दररोज मोठ्या संख्येने भाविक खंडोबाच्या देवदर्शन साठी येत असतात.

पालखी मार्गावर अंडरपास रोड करण्याचे नियोजन; श्री खंडोबा देवाच्या पालखी मार्गावर भुयारी मार्ग विचाराधीन

प्रत्येक सोमवती अमावस्या यात्रेत श्री खंडोबा देवाची पालखी कऱ्हा नदीवर  स्नानासाठी नेली जाते. या पालखी सोहळ्यामध्ये हजारो भाविक सहभागी होत असतात . कऱ्हा नदीवर जात असताना धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडून पालखी न्यावी लागते.  त्या ठिकाणी कोणती दुर्घटना घडू नये, धार्मिक विधीला गालबोट लागू नये याची दक्षता रेल्वे प्रशासन घेत आहे .पालखी मार्गावर भविष्यात अंडरपास व्यवस्था करण्यात येणार असून तसा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

Story img Loader