भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अध्यक्ष असलेल्या इंदापूर येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यात शनिवारी (२६ नोव्हेंबर) दिल्ली पोलिसांनी चौकशी केली. कारखान्याच्या विरोधात दिल्लीतील एका कंपनीने दाखल केलेल्या खटल्यात ही चौकशी करण्यात आली असून, या खटल्याबाबत संचालकांना नोटिसही बजावण्यात आली आहे.
साखर खरेदी-विक्रीच्या प्रकरणात दिल्लीतील एका कंपनीकडून साखर कारखान्याच्या विरोधात २०१९ मध्ये दावा दाखल केला आहे. त्याच्या सुनावणीसाठी कारखान्याचे संचालक मंडळ उपस्थित न राहिल्याने दिल्ली पोलिसांचे एक पथक शनिवारी सकाळी साखर कारखान्यात दाखल झाले.
कारखान्याच्या कार्यालयात काही काळ चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने काही संचालकांच्या घरीही चौकशी करून त्यांना नोटिस बजावल्याचे वृत्त आहे. या घडामोडींमुळे इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून किंवा कारखान्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.