छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (दिल्ली) : तब्बल सात दशकांनी देशाच्या राजधानीत होत असलेल्या मायमराठीच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी अनेकांनी दिल्ली गाठली खरी. पण, मराठीजनांच्या अपार उत्साहाने संयोजन कोलमडले. परिणामी, साहित्यप्रेमींच्या दुरवस्थेची सर‘हद्द’ पार झाली. त्याचा परिणाम म्हणून अनेकांनी उद्घाटन कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची शुक्रवारी शानदार ग्रंथदिंडीने सुरुवात झाली. या संमेलनास राज्याच्या विविध भागांतून आणि देशभरातून दिल्लीत आलेल्या साहित्यिकांसह रसिक, वाचकांना पहिल्या दिवशी गैरसोयीचा सामना करावा लागला. संमेलनाचे ओळखपत्र मिळविण्यापासून भोजन व्यवस्थेची सोय होईपर्यंत सर्वांनाच झगडावे लागले. काही वेळा तर कार्यकर्त्यांशी हुज्जत घालण्यापर्यंतचे प्रसंग घडले.
पुण्याहून सुटलेल्या महादजी शिंदे एक्स्प्रेसने तब्बल ३५ तासांचा प्रवास करून साहित्यिक आणि रसिक शुक्रवारी पहाटे दिल्लीत पोहोचले. तेथून निवास व्यवस्था असलेल्या ठिकाणी पोहोचेपर्यंत दोन तासांचा कालावधी द्यावा लागला. पुरेशी झोप न घेता मराठीच्या उत्सवासाठी साहित्यप्रेमी आवरून सकाळी साडेनऊ वाजता संसद भवन रस्त्यावर पोहोचले. अकरा वाजता ग्रंथदिंडी तालकटोरा स्टेडियमवर पोहोचली. त्यानंतर ओळखपत्र मिळविण्यासाठी एकच झुंबड उडाली. मात्र, सभासद शुल्क आगाऊ भरलेल्या अनेकांना ओळखपत्र आणि प्राथमिक सुविधाही न मिळाल्याने त्यांचे हाल झाले. त्यातच संमेलनस्थळाच्या आजूबाजूला चहा, न्याहरी मिळण्याची व्यवस्था नसल्यामुळे अनेकांना दुपारपर्यंत त्रास सहन करावा लागला. अगदी पिण्याच्या पाण्याचीही शोधाशोध करावी लागली.
व्यवस्थेबाबत प्रतिनिधींकडे चौकशी केल्यास, ‘आम्हाला काहीच माहिती नाही,’ अशी उत्तरे मिळत होती. त्यामुळे निवास व्यवस्था वगळता इतर सर्व गोष्टींत समन्वयाचा अभाव दिसला. त्यामुळे सर्वत्र सावळा गोंधळ पाहावयास मिळाला. भोजन कक्षात कुपनची गरज नसल्याची माहिती वेळ टळून गेल्यानंतर आयोजकांनी दिली. तोपर्यंत अनेकांनी मिळेल तिथे भोजन करून घेतले होते. तसेच, बाहेरून पाण्याच्या बाटल्याही घेतल्या होत्या.
प्रवेशपत्र मिळविण्यासाठी धावपळ
उद्घाटन सोहळ्याचे प्रवेशपत्र मिळविण्यासाठी पत्रकारांसह साहित्यिक आणि रसिकांना प्रचंड धावपळ करावी लागली. काहींची प्रवेशपत्रे विज्ञान भवन येथे, काहींची तालकटोरा स्टेडियम येथे, तर काहींची नवीन महाराष्ट्र सदन येथे ठेवण्यात आली होती. तिन्ही ठिकाणे लांब लांब अंतरांवर असल्याने प्रत्येक ठिकाणी टॅक्सी किंवा रिक्षा करून प्रवास करावा लागला. त्यामुळे प्रवेशपत्र तयार असूनही काहींनी उद्घाटन कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. ब्तर शेवटपर्यंत प्रवेशपत्र मिळालेच नाही. त्यामुळे दिल्लीला येऊनही उद्घाटन कार्यक्रम दूरचित्रवाणीवर पाहण्याची वेळ आली.