पुणे : ‘फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार’ हे गदिमा आणि सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेले गीत सर्वांच्या मुखामध्ये अजरामर आहे. त्याच धर्तीवर तब्बल सात दशकांनी दिल्लीमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवासादरम्यान ‘फिरत्या चाकावरती देसी शब्दांना आकार, तू साकार सारस्वताचा आविष्कार’ची प्रचिती येणार आहे ते रेल्वेच्या डब्यात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या आयोजनामुळेच.
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच देशाच्या राजधानीमध्ये २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. ‘दिल्ली अब दूर नहीं’ असे आपण म्हणत असलो तरी दिल्लीला पोहोचण्यासाठी खूप वेळ लागतो. ही बाब ध्यानात घेऊन संमेलनाच्या कार्यक्रमात इच्छा असूनही सर्वांना सामावून घेता येत नसल्याने साहित्यिकांसह दिल्लीला येणाऱ्या साहित्यप्रेमींना संधी देण्याच्या दृष्टीकोनातून फिरत्या चाकावरती साहित्य संमेलन आयोजनाची संकल्पना मूर्त रूपाला येत आहे, असे संमेलनाची आयोजक संस्था असलेल्या सरहद संस्थेचे संजय नहार यांनी सांगितले.
साहित्य संमेलन हा प्रत्येकाच्या आकर्षणाचा आणि आस्थेचा विषय आहे. संमेलनाच्या व्यासपीठावरून सादर होणाऱ्या चर्चासत्र, कथाकथन, परिसंवाद आणि कविसंमेलनात सहभाग मिळावा अशी साहित्यिकांची मनीषा असते. संमेलनाच्या कार्यक्रमांची चौकट ध्यानात घेता सर्वांनाच संधी देणे शक्य होत नाही. कविसंमेलन असो किंवा कवीकट्टा उपक्रमात तीन मिनिटांची कविता सादर करण्यासाठी कवींची धडपड असते. अशा काव्यप्रेमींना रेल्वेच्या डब्यामध्ये होणाऱ्या संमेलनात काव्य सादरीकरणाची संधी उपलब्ध होणार आहे. या मोठ्या पल्ल्याच्या प्रवासातील साहित्य संमेलनात चर्चासत्र, कथाकथन, काव्यगायन आणि परिसंवाद होणार असून त्यामध्ये सहभाग घेणारे साहित्यिक आणि साहित्यप्रेमींना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुस्तकांची भेट देऊन गौरविण्यात येणार आहे. सरहद संस्थेचे युवा कार्यकर्ते वैभव वाघ यांच्याकडे या संमेलनाच्या समन्वयकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे नहार यांनी सांगितले. यापूर्वी घुमान येथे झालेल्या संमेलनापूर्वी रेल्वेच्या डब्यात संमेलन झाले होते. त्याची पुनरावृत्ती आता होत असून रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये स्वतंत्र संमेलन भरविण्यात येणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पुण्याहून दिल्लीकडे रवाना होणाऱ्या विशेष रेल्वे प्रवासादरम्यान प्रत्येक डब्यामध्ये सूत्रबद्ध पद्धतीने छोटेखानी साहित्य संमेलन आयोजन करण्यात येणार आहे. दिल्ली काबीज करणारे वीर योद्धे म्हणून आपण ज्यांना ओळखतो अशा मूलतः कवी असलेल्या महादजी शिंदे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या रेल्वेचे ‘महादजी शिंदे एक्स्प्रेस’ असे नामकरण करण्यात येणार आहे. प्रवासात मनोरंजन होण्याबरोबरच विचारांचे आदानप्रदान व्हावे या उद्देशाने रेल्वेच्या डब्यांमध्ये संमेलन घेण्यात येणार आहे. – संजय नहार, अध्यक्ष, सरहद