महापौर वैशाली बनकर यांना बदलले जाणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाली असून प्रभाग ४० च्या पोटनिवडणुकीनंतर पुण्याच्या महापौरांबाबत राष्ट्रवादी निर्णय घेईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेविकांकडून जोरदार तयारी सुरू आहे.
महापौरपदाचा कालावधी अडीच वर्षांचा असला, तरी बनकर यांना नियुक्त करताना त्यांना सव्वा वर्षांसाठी नियुक्त करण्यात आल्याचे पक्षाचे नेते अजित पवार यांनी सांगितले होते. बनकर यांचा हा कालावधी आता पूर्ण झाला असून महापौरपद मागासवर्ग प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून या पदासाठी नंदा लोणकर, चंचला कोद्रे, संगीता कुदळे यांचा दावा आहे. त्याबरोबरच अपक्ष म्हणून निवडून आलेल्या अश्विनी कदम यांनीही राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेला असल्यामुळे त्यांचेही नाव या पदासाठी घेतले जात आहे. प्रभाग ४० मधील पोटनिवडणुकीचा निकाल ८ जुलै रोजी लागणार आहे. त्यानंतर लगेचच नव्या महापौरांबद्दलचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
‘संधी मिळाल्यास आवडेल’
दरम्यान, महापौर बनकर यांना या चर्चेबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, अद्याप पक्षाने मला कोणताही आदेश दिलेला नाही. मात्र, पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. पक्षाने मला मोठी संधी दिली आहे. पुन्हा संधी दिली गेली, तर या पदावर काम करायला मला निश्चितच आवडेल.
‘पुढील दौऱ्यावर काळजी घेऊन जाऊ’
महापौर वैशाली बनकर तसेच अन्य काही पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सहकुटुंब कोरिया दौऱ्याबद्दल चहूकडून टीका होत आहे आणि या दौऱ्याच्या चौकशीचेही आदेश राज्य शासनाने दिले आहेत. तरी महापौर मात्र दौऱ्यांबाबत ठाम आहेत. दौऱ्यावर जाण्याबाबत आम्हाला सगळी माहिती नव्हती. प्रशासनाकडूनही पुरेशी माहिती दिली गेली नव्हती. पुढील दौऱ्यांवर जाताना मात्र आम्ही काळजी घेऊ, असे महापौरांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दौऱ्यांवर गेल्यामुळे नवीन माहिती मिळते, त्याचा आपल्या शहराला उपयोग करून घेता येतो. म्हणून पुढच्या दौऱ्याच्यावेळी आम्ही काळजी घेऊ, असेही त्या म्हणाल्या.

Story img Loader