पिंपरी-चिंचवड शहरात वरचष्मा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अतिशय अडचणीचे ठरू लागलेल्या आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीच्या नुसत्या चर्चेने शहरातील राजकारण पेटले आहे. आयुक्तांविषयी तक्रारी करणारा विरोधी पक्षच त्यांच्या बचावासाठी पुढे आला आहे. केवळ बदलीच्या चर्चेने ही अवस्था असल्याने खरोखर बदली केल्यास काय होईल, याची कल्पना यानिमित्ताने पक्षनेतृत्वाला आली आहे.
महापालिका आयुक्तपदी रूजू झाल्यापासून आपल्या विशिष्ट कार्यपध्दतीचा प्रत्यय देत परदेशी यांनी धडाकेबाज पध्दतीने कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये त्यांची चांगली प्रतिमा तयार झाली आहे. अनधिकृत बांधकामांच्या विरोधातील कारवाई असो की अधिकाऱ्यांवरील बदल्यांची व निलंबनाची कारवाई असो, राष्ट्रवादीला त्याचा फटका बसतो आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शड्डू ठोकून उतरलेल्या आयुक्तांच्या बदलीचा विषय सुरुवातीपासूनच चर्चेत येत राहिला आहे. आपण जेथे जातो, तेथे दोन महिन्यात बदलीची चर्चा सुरू होते, अशी टिपणी खुद्द आयुक्तांनीच केली आहे. आता मात्र या विषयाची तीव्रता वाढली आहे. मुंबई येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लोकसभेच्या मतदारसंघाची चर्चा सुरू असताना आयुक्तांच्या बदलीचा विषय स्थानिक नेत्यांकडून मांडला गेला, यावरून राष्ट्रवादीची अडचण लक्षात येऊ शकते.
पिंपरी पालिकेचे कारभारी अजित पवार यांचेही आयुक्त ऐकत नाहीत, असे अनेक प्रकरणांमधून पुढे आले आहे. त्यामुळे आयुक्तांच्या बदलीचा विषय त्यांच्याही मनात आहे. तथापि, थेट कारवाई करताना त्यांच्यासमोरही अडचणी आहेत. अशा परिस्थितीत आयुक्तांच्या संभाव्य बदलीचे राजकारण आतापासूनच सुरू झाले आहे. शिवसेना, भाजप आयुक्तांच्या बाजूने रस्त्यावर उतरले आहेत. त्यामागे राष्ट्रवादीची कोंडी करण्याचे डावपेच आहेत.
डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीच्या चर्चेने पिंपरीतील राजकारण पेटले
पिंपरी-चिंचवड शहरात वरचष्मा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अतिशय अडचणीचे ठरू लागलेल्या आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीच्या नुसत्या चर्चेने शहरातील राजकारण पेटले आहे.
आणखी वाचा
First published on: 01-05-2013 at 04:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deliberation of transfer of dr shrikar pardeshi turned politics in pimpri