महापालिकेच्या माध्यमिक शाळांसाठी असलेले शिक्षणाधिकारी हे पद गेले अनेक महिने रिक्त असून, या पदावर ज्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांनी तातडीने कार्यभार स्वीकारण्याचे आदेश काढावेत, अशी मागणी शिक्षण संचालकांकडे करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन सजग नागरिक मंचतर्फे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी सोमवारी दिले. महापालिकेच्या २५ शाळांमधून आठवी ते दहावीचे दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या २५ शाळांपैकी चार शाळांना मुख्याध्यापकच नसल्यामुळे तेथील शिक्षकांना प्रभारी मुख्याध्यापक ही जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच या सर्व शाळांचे ‘प्रशासनिक प्रमुख’ म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची नेमणूक राज्य शासनाकडून केली जाते. चार महिन्यांपूर्वी हे पद रिक्त झाले असून महापालिकेचे कामगार कल्याण अधिकारी शिवाजी दौंडकर या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. त्यांच्याकडे मुळातच कामगार कल्याण अधिकारी तसेच शिक्षण प्रमुख अशा जबाबदाऱ्या आहेत, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राज्य शासनाने जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याची नियुक्ती माध्यमिक विभागात शिक्षणाधिकारी म्हणून केली असून, दोन महिने होऊनही संबंधित अधिकारी अद्याप रुजू झालेले नाहीत. त्यामुळे माध्यमिक विभागाला प्रमुखच नाही आणि कामकाजही ठप्प झाले आहे. याबाबतीत लक्ष घालून ज्या अधिकाऱ्याची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे त्यांनी तातडीने कार्यभार स्वीकारण्यासाठीचे आदेश काढावेत, अशीही मागणी सजग नागरिक मंचने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा