महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या अंतिम निकालाबरोबरच उमेदवारांची प्रतीक्षा यादीही जाहीर करण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. प्रतीक्षा यादी नसल्यामुळे    वयोमर्यादा संपणाऱ्या उमेदवारांचे नुकसान होत असल्याची उमेदवारांची तक्रार आहे.
शासकीय विभागात शासनाकडून मंजूर झालेल्या पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांची शासनाकडे शिफारस करण्यात येते. मात्र त्यातील काही उमेदवार प्रत्यक्षात रुजू होत नाहीत आणि त्यामुळे ते पद रिक्त राहाते. रिक्त पद पुढील परीक्षेसाठीच्या पदांमध्ये समाविष्ट करण्यात येते. मात्र त्यामुळे ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपत आहे, त्यांना जागा रिक्त राहूनही पद मिळत नाही. या पाश्र्वभूमीवर प्रत्येक परीक्षेच्या निकालानंतर प्रतीक्षा यादी जाहीर करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
प्रत्येक परीक्षेनंतर प्रतीक्षा यादी जाहीर करण्याचा निर्णय आयोगाने २०१४ मध्ये घेतला होता. त्यानुसार एक वर्ष किंवा पुढील जाहिरात येईपर्यंत प्रतीक्षा यादी जाहीर करण्याची तरतूद करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याची उमेदवारांची तक्रार आहे. गेल्या वर्षीच्या अनेक परीक्षांसाठी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली नसल्याचे उमेदवारांनी सांगितले.
सहायक परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहायक परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कोल्हापूर येथील अजिंक्य आजगेकर राज्यात प्रथम आले आहेत. राखीव वर्गातून ठाणे येथील प्रकाश बिक्कड, तर महिलांमधून लातूर येथील स्वाती सोमवंशी हे पहिले आले आहेत. एकूण ९६ पदांसाठी ८ नोव्हेंबर २०१५ रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा