पुणे : नवरात्रौत्सवात केळ्यांना मागणी वाढते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून उपवासाच्या तयार खाद्यपदार्थांना मागणी वाढली असल्याने केळीच्या मागणीत घट झाली आहे. नवरात्रौत्सवात अनेकजण उपवास करतात. उपवास करणाऱ्यांकडून केळीला मागणी वाढते. केळीसह पेरू, सीताफळ, संत्री, माेसंबी, सफरचंद या फळांच्या मागणीत वाढ होते. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात नवरात्रोत्सवात केळ्यांची मोठी आवक होते.

नेहमीच्या तुलनेत केळ्यांची आवक दुपटीने वाढते. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून केळ्यांच्या मागणीत घट होत आहे. काही वर्षांपूर्वी विविध मंदिरांत भाविकांना केळीवाटप केले जायचे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्याऐवजी उपवासाच्या खाद्यपदार्थांच्या तयार पाकिटांचे वाटप केले जात आहे. उपवास करणाऱ्यांकडून खाद्यपदार्थांच्या पाकिटांना मागणी वाढत आहे, असे निरीक्षण मार्केट यार्डातील केळी बाजार विभागाचे अध्यक्ष विठ्ठल वायकर यांनी नोंदविले.

हे ही वाचा…तपासाच्या व्याप्तीत वाढ बोपदेव घाट प्रकरणी सराइत लुटारूंची चौकशी; आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके

पुणे जिल्ह्यातील इंदापूर, जुन्नर, सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, नातेपुते, कंधर, वांगणी भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर केळीलागवड करतात. केळीलागवडीसाठी पाणी लागते. ठिबक सिंचनाद्वारे केळीलागवड केली जाते. वर्षभरानंतर केळीलागवड होते. पुणे, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मार्केट यार्डातील केळी बाजारात केळी विक्रीस पाठवितात. नवरात्रौत्सवात दररोज ३० ते ४० टन केळ्यांची बाजारात आवक होते. घाऊक बाजारात केळ्यांची किलोच्या दराने विक्री केली जाते. एक किलो केळ्यांची प्रतवारीनुसार १४ ते १६ रुपये दराने विक्री केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

वखारीतून विक्री

मार्केट यार्डात केळी बाजारात वखारी आहेत. काही वर्षांपूर्वी पुणे शहर, जिल्ह्यात केळी बाजारातून केळी विक्रीस पाठविली जायची. गेल्या काही वर्षांपासून उपनगरातील व्यापाऱ्यांनी वखारी सुरू केल्या आहेत. सिंहगड रस्ता, चिंचवड, नगर रस्ता, कोथरूड भागांत केळीच्या वखारी आहेत.

नवरात्रोत्सवात केळ्यांना मागणी वाढते. मात्र, तीन वर्षांपासून केळ्यांच्या मागणीत घट होत आहे. पूर्वी नवरात्रोत्सवात दररोज ६० ते ७० टन केळ्यांची आवक व्हायची. ती आता निम्म्यावर आली आहे. साधारणपणे ३० ते ४० टन आवक मार्केट यार्डात होत आहे. उत्सवानंतर आवक आणि दर आणखी कमी होतील. घाऊक बाजारात किलोच्या दराने केळ्यांची विक्री केली जाते. किरकोळ बाजारात एक डझन केळ्यांची विक्री प्रतवारीनुसार ६० ते ८० रुपये दराने केली जात आहे.- विठ्ठल वायकर, केळी व्यापारी, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड केळी बाजार विभाग.

हे ही वाचा…बुलेटस्वार-कार चालकातील किरकोळ वाद विकोपाला; बुलेटवरील तरुणाला गमवावा लागला हात!

यंदा केळी मुबलक

भिगवण, इंदापूर भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर केळीलागवड करतात. केळीसाठी काळीभोर जमीन आणि मुबलक पाणी लागते. यंदा उजनी धरण शंभर टक्के भरल्याने केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर होणार आहे.