पुणे : राज्यात २०१९ आणि २०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकारातील उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षेत अपात्र करण्याची व पवित्र संकेतस्थळावर नोंदणी करण्यास प्रतिबंध करण्याची मागणी डीटीएड, बी.एड. स्टुडंट असोसिएशनने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
गेल्यावर्षी शिक्षक पात्रता परीक्षेचा गैरप्रकार उघडकीस आला. त्यात सुमारे सात हजार ८८० उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यानुसार गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची परीक्षेतील संपादणूक रद्द करून त्यांना पुढील पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्याचे परिपत्रक राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केले आहे. मात्र, गैरप्रकार केलेल्या उमेदवारांनी प्रस्तावित शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेली अभियोग्यता परीक्षा व बुद्धिमापन चाचणी परीक्षा दिली आहे. अनेक उमेदवारांनी टीईटी परीक्षा देऊन अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी दिली आहे.
मात्र, संबंधित उमेदवार शिक्षक होण्यास नैतिकदृष्टय़ा पात्र नाहीत. त्यामुळे आधार पडताळणीद्वारे त्यांना प्रतिबंधित करावे, जेणेकरून त्यांचा निवडयादीत विचार होणार नाही. अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीत संबंधित उमेदवारांना अपात्र करून पवित्र संकेतस्थळावर नोंदणी करण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी असोसिएशनचे संस्थापक-अध्यक्ष संतोष मगर यांनी केली.