पुणे : लोनॲपच्या माध्यमातून नागरिकांना धमकावण्याचे सत्र कायम आहे. एका महिलेला धमकावून तिच्याकडे एक लाख ११ हजार रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सायबर पाेलिसांनी बंगळुरूतून नऊजणांना अटक केली.

विघ्नेश मंजुनाथ, गणेश सुब्बारायडू, आकाश एम. व्ही., श्रद्धा सुधाकर गौडा, पार्वती संतोष दास, अश्विनी डी मुरुगन, शिल्पा सुभाष गौडा, प्रिया एस., दीपिका एल. (सर्व रा. बंगळुरू) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात सायबर पोलिस ठाण्यात खंडणी, फसवणूक, अब्रुनुकसानी, धमकावणे आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३०  वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. 

तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर आरोपींनी संपर्क साधून तिला लोनॲप डाऊनलोड करण्यास सांगितले होते. महिलेला कर्जाची गरज नव्हती. मात्र, आरोपींनी तिला लोनॲपच्या माध्यमातून कर्ज मंजूर करुन तिला व्याजासाठी धमकावण्यास सुरू केले. महिलेच्या छायाचित्रात फेरफार करुन समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडे एक लाख ११ हजार रुपयांची खंडणी मागितली. आरोपींनी महिलेच्या मोबाइलमधील माहिती चोरली होती. या माहितीचा गैरवापर करुन तिला धमकावण्यास सुरुवात केली. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर बंगळुरूतून नऊ जणांना अटक करण्यात आली.

लोनॲप प्रकरणातील मोठी कारवाई

शहरातील एका तरुणाने लोनॲपच्या तगाद्यामुळे आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. लोनॲपच्या विरोधातील वाढत्या तक्रारींची दखल घेऊन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाईचे आदेश दिले होते. पोलिसांनी लोनॲप प्रकरणात बंगळुरूतील नऊ जणांना अटक केली. पुणे पोलिसांनी लोनॲप प्रकरणात केलेली पहिली मोठी कारवाई आहे.

आरोपींकडे हजारो जणांचा विदा 

बंगळुरूतून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे अनेकांच्या मोबाइलमधील विदा (डाटा) सापडला आहे. आरोपींनी अनेकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असून न्यायालयाने आरोपींनी पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती सरकारी वकील ॲड. विजयसिंह जाधव यांनी युक्तीवादात केली. आरोपींना न्यायालयाने ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

बंगळुरूत कल सेंटर आरोपी बंगळुरूत कॉल सेंटर चालवत होते. लोनॲप डाऊनलोड करण्यास ते नागरिकांना सांगायचे. लोनॲप डाऊनलोड केल्यानंतर वैयक्तिक माहिती चोरून नागरिकांना धमकावत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.

Story img Loader