पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनी आठवडाभरापूर्वीच चाकण एमआयडीसीत बैठक घेऊन स्थानिक गुंडांकडून विनाकारण कंपनी व्यवस्थापनास त्रास होत असल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला असतानाच ‘मोक्का’अंतर्गत कारवाई झालेल्या सराईत गुन्हेगाराकडून उद्योजकाकडे महिन्याला एक लाख दहा हजार रुपये खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चाकण एमआयडीसी परिसरात व्यवसाय करायचा असेल तर महिन्याला एक लाख दहा हजार रुपये हप्ता दे. अन्यथा, तुमची विकेट टाकून जीवे मारणार, अशी धमकी गुन्हेगाराने उद्योजकाला दिली. या गुंडाला पोलिसांनी अटक केली. प्रदीप उर्फ गोट्या पडवळ (वय ३१, रा. आंबेठाण, ता. खेड) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. अमोल दामोदर शेडगे (वय ३५, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शेडगे हे उद्योजक असून चाकण एमआयडीसी परिसरात त्यांचा व्यवसाय आहे.

हेही वाचा – विधानसभा निवडणुकीतील पैशावर ‘नजर’! प्राप्तिकर विभागाचे सर्व उमेदवारांवर लक्ष; नागरिकही सहभागी होऊ शकणार

आरोपी पडवळ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दरोडा, दरोडा टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईही झालेली आहे. १६ ऑक्टोबर रोजी आरोपी पडवळ याने फिर्यादी आणि त्यांच्या भावाला फोनवर शिवीगाळ व दमदाटी केली. चाकण एमआयडीसीत व्यवसाय करायचा असेल तर महिन्याला एक लाख दहा हजार रुपये हप्ता दे. हप्ता दिला नाही तर तुमची विकेट टाकून जीवे मारणार, अशी धमकी दिली.

हेही वाचा – Kothrud Assembly Constituency : चंद्रकांत पाटील पुन्हा बाजी मारणार का? कोथरूडमध्ये कुणाचं पारडं जड मविआ की महायुती?

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आठ ऑक्टोबर रोजी चाकण एमआयडीसीत कंपनी व्यवस्थापकांसमवेत बैठक घेतली होती. या बैठकीत एमआयडीसीतील कारखाने टिकविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी एमआयडीसी भयमुक्त करण्यास प्राधान्य आहे. स्थानिक गुंड, कामगार संघटना किंवा माथाडी कामगार विनाकारण कंपनी व्यवस्थापनास त्रास देत असल्यास कडक कारवाई करण्यात येईल. कंपनी व्यवस्थापन, उद्योजकांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन चौबे यांनी केले होते. त्यानंतर आठच दिवसांत हा प्रकार घडला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for extortion from businessman within eight days after meeting of police commissioner incident in chakan midc pune print news ggy 03 ssb