पुणे : थंडी सुरू झाल्यानंतर हुरड्याची आवक सुरू झाली आहे. हुरड्याला चांगली मागणी असून किरकोळ बाजारात एक किलो हुरड्याचे दर २५० ते ३५० रुपये दरम्यान आहेत. थंडी सुरू झाल्यानंतर हुरड्याची आवक सुरू होते. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात औरंगाबाद, नगर जिल्ह्यातून दररोज २०० ते ३०० किलो हुरड्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात एक किलो हुरड्याची विक्री २०० ते ३०० रुपये दराने केली जात आहे. यंदा हुरड्याच्या दरात वाढ झाली नाही. येत्या पंधरा दिवसांत हुरड्याची आवक आणखी वाढेल, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील व्यापारी माउली आंबेकर आणि पांडुरंग सुपेकर यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरगुती ग्राहकांसह हाॅटेलचालकांकडून हुरड्याला चांगली मागणी आहे. लोणावळा, कोकण भागातून हुरड्याला मागणी आहे. डिसेंबर महिन्यात हुरड्याचा हंगाम सुरू होतो. फेब्रुवारी महिन्यापर्यंत हुरड्याची आवक होत असते. सुरती आणि गूळभेंडी जातीचा हुरडा बाजारात उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून हाॅटेलचालकांकडून हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे, हुरड्याला चांगली मागणी असून दर चांगले मिळाल्याने शेतकरी समाधानी आहेत, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – समाजमाध्यमातील खात्यावर पिस्तुलाचे छायाचित्र ठेवणे पडले महाग, तरुणाला अटक

थंडी सुरू झाली की हुरड्याला मागणी वाढते. हुरडा पार्टी करण्यासाठी पूर्वी अनेक जण सहकुटुंब ग्रामीण भागातील कृषी पर्यटन केंद्रात जायचे. गेल्या तीन वर्षांपासून बाजारात हुरड्याची पाकिटे विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे, घरीच हुरडा पार्टी साजरी करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. घरगुती ग्राहकांकडून पाकिटातील हुरड्याला चांगली मागणी आहे, असे मार्केट यार्डातील व्यापारी माउली आंबेकर, पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for hurda increase hurda packets available in pune pune print news rbk 25 ssb