काही ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर छुप्यात पद्धतीने

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर राज्य शासनाने बंदी घातल्यानंतर शहरात कागदी पिशव्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. प्लास्टिक पिशवीचा वापर करणारे किराणा माल व्यावसायिक, फळभाजी विक्रेते तसेच किरकोळ विक्रेत्यांनी कागदी पिशव्यांचा वापर मोठय़ा प्रमाणात सुरू केला आहे. मात्र, कागदी पिशव्या अधिक वजन पेलू  शकत नसल्याने प्लास्टिक पिशव्यांचा वापर काही प्रमाणात छुप्या पद्धतीने सुरू आहे.

प्लास्टिक बंदीचे आदेश सरकारकडून देण्यात आल्यानंतर बाजारातील भाजी तसेच फळ विक्रे ते, किराणामाल विक्रेत्यांसह अनेक व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानातून प्लास्टिक पिशव्या हद्दपार केल्या आहेत. कारवाईच्या धसक्यामुळे कागदी पिशव्यांचा वापर सुरूकरण्यात आला असला तरी कागदी पिशव्या जादा वजनाचा माल वाहून नेण्यात तकलादू ठरत असल्याची ओरड विक्रेते करत आहेत.

प्लास्टिक बंदीचे आदेश आल्यानंतर व्यापारी तसेच विक्रेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. वजनाने हलक्या असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा (पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या) वापर फळे तसेच      भाजीपाला विक्रेत्यांकडून केला जातो. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आल्यामुळे शहरातील मंडई, नेहरू चौक भागातील फळे तसेच भाजीपाला विक्रेत्यांनी प्लास्टिक पिशव्या हद्दपार केल्या आहेत. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असल्यामुळे त्यांनी कागदी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. रविवार पेठेतील बोहरी आळी भागात कागदी पिशव्यांचे विक्रेते आहेत. या विक्रेत्यांनी कागदी पिशव्या विक्रीस ठेवल्या आहेत.

साधारणपणे पंधरा ते वीस वर्षांपूर्वी कागदी पुडीतून साखर, चहा पावडर आणि अन्य किराणा माल बांधून दिला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या पद्धतीने खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. पाच ते दहा किलो साखर किंवा तांदूळ घेतल्यास ती कागदी पिशवीत देता येत नाही. कागदी पिशव्या जादा वजनाचा भार पेलू शकत नाहीत. त्यामुळे ग्राहकांकडून प्लास्टिक पिशवीबाबत विचारणा होते, अशी माहिती किराणामाल विक्रेत्यांकडून देण्यात आली.

पर्याय एकच कापडी पिशवी

किराणा माल विक्रेते तसेच भाजी विक्रेते माल कागदी पिशवीत किंवा कागदाच्या पुडीत देत आहेत, मात्र कागदी पिशव्या अधिक भार उचलू शकत नाहीत. कागदी पिशवीत भरलेला माल ठेवण्यासाठी कापडी पिशवीशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाही. भाज्या कागदी पिशवीत ठेवल्यास त्या फाटण्याची शक्यता जास्त असते. कागदी पिशवीला पर्याय उपलब्ध नाही, अशी माहिती किरकोळ बाजारातील भाजीविक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी दिली.

कागदी पिशव्यांमुळे उत्पन्नाचे साधन

प्लास्टिक पिशवी बंदीनंतर अनेकांनी कागदी पिशव्या तयार करण्यास सुरुवात केली आहे. कागदी पिशव्या घरीदेखील तयार करता येतात. जुनी वृत्तपत्रे तसेच नियतकालिकांच्या जाड कागदपासून कागदी पिशव्या तयार केल्या जातात. या पिशव्या मोठय़ा व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी पाठविल्या जातात. गंज पेठ, रविवार पेठ भागातील अनेक महिलांनी घरी कागदी पिशव्या तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for paper bags shoots up after ban on plastic carry bags