पुणे : ‘डीआरडीओ’चे संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप कुरुलकर यांची पाॅलिग्राफ, तसेच व्हाॅइस लेअर चाचणी करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी न्यायालयात केली. न्यायालयाने या दोन्ही चाचण्यांमध्ये नेमका फरक काय असतो, अशी विचारणा एटीएस अधिकाऱ्यांकडे केली. एटीएस अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने न्यायालयाने एटीएसच्या अर्जावर सुनावणी घेण्यापूर्वी दोन्ही चाचण्यांमधील मूलभूत फरक स्पष्ट करण्याची सूचना दिली. या प्रकरणात पुढील सुनावणी शुक्रवारी (३० जून) रोजी होणार आहे.
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरुन डाॅ. कुरुलकर यांना चार मे रोजी एटीएसने अटक केली हाेती. कुरुलकर सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, कुरुलकर तपासात सहकार्य करत नसल्याने त्यांची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हाॅइस लेअर अँड ॲनालिसिस चाचणी करण्याची मागणी एटीएस न्यायालयाकडे केली. याबाबतचा अर्ज एटीएसने सोमावरी विशेष न्यायालयात सादर केला. विशेष सरकारी वकील ॲड. विजय फरगडे यांनी एटीएसकडून बाजू मांडली.
हेही वाचा >>>पुणे : कोंढव्यात पावसात थांबलेल्या तरुणाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू
न्यायालयाने व्हाॅइस लेअर ॲनालिसिस चाचणी म्हणजे काय, ती कशासाठी केली जाते, यापूर्वी ही चाचणी कोणाची झाली आहे का?, अशी विचारणा एटीएसच्या अधिकाऱ्यांकडे केली. मात्र, एटीएसच्या अधिकाऱ्यांना माहिती देता आली नाही. त्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी चाचणीबाबत सुनावणी घेण्यापूर्वी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले. दरम्यान, कुरुलकर यांनी दोन्ही चाचण्या करण्यास नकार दिला असून, न्यायालयात विरोध दर्शविणार असल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले.