वार्ताहर, लोकसत्ता

इंदापूर : इंदापूर व करमाळा तालुक्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी गोयेगाव (ता. करमाळा) ते आगोती (ता इंदापूर) दरम्यान उजनी जलाशयात पूल करण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी अशी मागणी करमाळ्याचे शिवसेना नेते( शिंदे गट )दिग्विजय बागल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात बागल यांनी म्हटले आहे की, करमाळा व इंदापूर तालुक्यातील नागरीकांना हाकेच्या अंतरावरील गावात जाण्यासाठी भिगवण ,टेंभुर्णी मार्गे ९० ते १०० किमी प्रवास करावा लागतो. त्यामुळे पैसे व वेळेची बचतीसाठी होडीतून जीवघेणा प्रवास करावा लागतो. परिणामी ५०हून अधिक जणांना आजपर्यंत उजनी धरणात जलसमाधी मिळाली आहे.

उजनी धरणाच्या निर्मितीनंतर या भागात केळी, डाळींब, ऊस व इतर फळबागांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे हा परिसर फळे व साखर पट्टा म्हणून ओळखला जातो. उजनी जलाशयावर देशी- विदेशी पक्षी हजेरी लावत असल्याने पक्षीप्रेमी मोठ्या प्रमाणात या परिसरात येत असतात. कृषि पर्यटन, मासेमारी, साखर उद्योग, वनस्पती अभ्यासक, नौकाविहार, जलपर्यटन, यांना चालना देण्यासाठी गोयेगाव ते आगोती दरम्यान भीमा नदीवर पूल बांधण्याची गरज आहे. आगोती ते गोयेगाव भीमा नदीचे अंतर कमी असून दोन्ही किनाऱ्या पर्यंत रस्ते उपलब्ध आहेत.त्यामुळे जमीन संपादनाची आवश्यकता नाही. दोन्ही बाजुकडुन तीनशे तीनशे मीटर पर्यंतचे भराव आणि मुख्य नदी पात्रात पूल झाल्यास येथील विकासाला निश्चित चालना मिळेल. असे दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.

दरम्यान, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिरसोडी- कुगाव या महत्वकांक्षी पुलाच्या कामाला वेग आला आहे. सुमारे तीनशे पन्नास कोटी रुपये खर्चाच्या या पुलाच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी अल्पावधीतच पूल मंजूर करून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. सध्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काम सुरू झाले आहे. या कामासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने या कामाबाबत परिसरामध्ये लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

४५ वर्षांपूर्वी उजनी धरणात पाणी आडण्यास प्रारंभ झाल्यानंतर भीमा नदीच्या काठावरील हाकेच्या अंतरावरील ऐलतीर व पैल तीरावरील गावे एकामेकांपासून दुरावली होती. या गावांचे धरण होण्याच्या अगोदर मोठे स्नेह संबंध होते. देवाण-घेवाण, व्यवहार होते. बाजारहाटासाठी लोक या बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे सहज जात येत होते .मात्र उजनी धरणाचे पाणी आडण्यास प्रारंभ झाल्यानंतर या दोन्ही गावांचे संबंध संपुष्टात आले होते. या गावांची एकरूप होऊन जोडलेली गेलेली नाळ तुटली तुटली होती.

मात्र, इंदापूर तालुक्यातील शिरसोडी व करमाळा तालुक्यातील कुगाव या फुलाच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्याचे ऋणानुबंध पुन्हा जुळणार आहेत. या पुलाच्या कामासाठी इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भरत शहा तसेच कुगावच्या माजी सरपंच तेजस्विनी कोकरे धुळाभाऊ कोकरे आदींनीही सातत्याने प्रयत्न केले .या प्रयत्नाला आता मूर्त रूप येत आहे. त्याशिवाय मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अंतर १०० किलोमीटर कमी होऊन मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग तयार होणार आहे. लोकांची आवक – जावक वाढुन इंदापूर शहराच्या आर्थिक उलाढालीत वाढ होईल.

भाजीपाला ,तरकारी, व केळी मालाला पुणे- मुंबई बाजारपेठ तात्काळ उपलब्ध होणार आहे. उसासाठी पुणे जिल्ह्यातील पर्यायी कारखाने उपलब्ध होणार असून केळी निर्यातीस मुंबई बंदरावर जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. परिसरात रोजगार निर्मितीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढून उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्यटनाच्या मोठ्या संधी निर्माण होतील. परंतु उजनी धरणाचं पाणलोट क्षेत्राचे अंतर फार मोठे असल्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी पूल व्हावा. ही मागणी गेले अनेक दिवस होत होती. अनेक गावांना वळसा घालून लोकांना ये – जा करावी लागते. त्यामुळे या पुलाला अंदाज पत्रकामध्ये मंजुरी मिळावी. अशी आग्रही मागणी बागल यांनी केली आहे.

Story img Loader