पिंपरी : सराईत गुन्हेगाराला तुरुंगातून सोडविण्यासाठी दोन लाखांची खंडणी न दिल्याने ११ जणांच्या टोळक्याने पाच जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कोयत्याचा धाक दाखवून खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार काळेवाडीत घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याप्रकरणी अमोल खेडेकर, गणेश बोरुडे, शुभम खेडेकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, त्यांच्या आठ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते पसार झाले आहेत. याबाबत सचिन बाबाजी काळे यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक वैभव गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार प्रशांत दिघे हा तुरुंगात आहे. त्याला तुरुंगातून सोडण्यासाठी अमोल याने सचिन यांच्याकडे दोन लाखांच्या खंडणीची मागणी केली. सचिन यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग मनात धरून अमोल हा साथीदारांसह ६ मार्च रोजी सचिन यांच्या कार्यालयात जबरदस्तीने घुसला. सचिन यांचा भाऊ राहुल यांना ‘तुम्हाला सरळ भाषेत सांगून तुम्ही पैसे देत नाहीत, आज तुमची सगळ्यांची विकेट टाकतो,’ अशी धमकी देऊन हातातील बाटली फेकून मारली. त्यानंतर सचिन हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना आरोपींनी त्यांना अडविले. आरडाओरडा, शिवीगाळ केली. एक आरोपी कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण करीत होता. सचिन, त्यांचा भाऊ राहुल, शुभम काळे, निहाल नदाफ, उमेश जोगदंड यांना आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कोयत्याचा धाक दाखवून खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी देऊन संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण केली.