पुणे : छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल मनात आदर आहे. त्यांनी समाजातील सर्व घटकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजे यांना सोमवारी केले.
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांनी विरोध दर्शविला आहे. गेल्या दोन महिन्यांत दिलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याची मागणीही भुजबळ यांनी केली आहे. या संदर्भात मराठा समाज आणि ओबीसी यांच्यातील संघर्ष तीव्र झाला असून, छत्रपती संभाजीराजे यांनी भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. राज्यातील सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचे काम भुजबळ करत आहेत. केवळ राजकीय स्थान टिकविण्यासाठी दोन समाजांत ते भांडण लावत आहेत, असा आरोप छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे मुक्कामी छगन भुजबळ यांनी त्या संदर्भात प्रतिक्रिया देताना संभाजीराजे यांना आवाहन केले.
हेही वाचा – ४० सीसीटीव्ही फुटेज, ७१ वाहनांची तपासणी, तरीही ठाणेदाराचे पिस्तूल मिळेना
हेही वाचा – नागपूर : हिवाळी अधिवेशन काळात खोदकाम नको, महावितरण म्हणते…
संभाजीराजे यांच्याबाबत मनात आदर आहे. ते ज्या गादीचे वंशज आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व घटक, समाज त्यांचा आहे. त्यामुळे त्यांनी सर्व समाजाला न्याय देण्याचे काम केले पाहिजे, असे भुजबळ म्हणाले. दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास भुजबळ यांचा विरोध असल्याने मराठा समाजाविरोधात ओबीसी असा वाद सुरू आहे. त्यातून स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहाबाहेर भुजबळ यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे तेथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भुजबळ यांची गाडी फोडण्याचा इशाराही स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव यांनी दिला.