पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये होणाऱ्या सततच्या गोंधळाचा ठपका परीक्षा नियंत्रकांवर ठेवून पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक कृती समितीने परीक्षा नियंत्रकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दहा दिवसांमध्ये परीक्षा नियंत्रकांनी पदभार न सोडल्यास विद्यापीठ बंद केले जाईल, असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला.

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये निकालात चुका, उशिरा निकाल लागणे, ऑनलाईन परीक्षा अर्जाचे गोंधळ, पुनर्मूल्यांकनातील गोंधळ असे अनेक मुद्दे सध्या गाजत आहेत. त्यासाठी परीक्षा नियंत्रक डॉ. संपदा जोशी यांच्या राजीनाम्याची मागणी परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी केली आहे. परीक्षा विभागातील सर्व चुका ऑटोमेशनच्या नावाखाली झाकल्या जात आहेत. परीक्षा नियंत्रकांचा विभागातील कर्मचाऱ्यांशी संवाद नसल्यामुळे या अडचणी उद्भवत असल्याची तक्रार शिक्षकेतर सेवक कृती समितीने केली आहे. समितीने त्यांच्या मागण्यांचे पत्र कुलगुरूंना दिले असल्याचे समितीतील सदस्यांनी सांगितले. परीक्षा नियंत्रकांनी दहा दिवसांमध्ये राजीनामा दिला नाही, तर विद्यापीठ बंद केले जाईल, असा इशाराही कृती समितीने दिला आहे.