लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : मार्गशीर्ष महिना येत्या गुरुवारपासून (१४ डिसेंबर) सुरू होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यात कांदापतीला मागणी वाढणार असून, कांदापात आतापासून महाग झाली आहे. कांदापातीच्या जुडीमागे तीन ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांदापातीच्या एका जुडीचे दर २५ ते ३० रुपयांपर्यंत आहेत.

मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठी उत्सवानिमित्त नैवेद्यासाठी कांदापातीला मागणी वाढते. चंपाषष्ठी १८ डिसेंबर रोजी आहे. चंपाषष्ठी उत्सवापूर्वीच घाऊक आणि किरकोळ बाजारात कांदापातीच्या मागणीत वाढ झाल्याने दरात वाढ झाल्याची माहिती मार्केट यार्डातील पालेभाजी व्यापाऱ्यांनी दिली. कांदापातीसह शेपू, पुदिन्याच्या दरात वाढ झाली आहे. मुळा आणि हरभरा गड्डीच्या दरात घट झाली आहे. कोथंबिर, मेथी, चाकवत, करडई, अंबाडी, राजगिरा, चुका, चवळई, पालकाचे दर स्थिर आहेत.

आणखी वाचा-पुणेकरांची पसंती परवडणाऱ्या घरांना! नोव्हेंबरमध्ये एकूण विक्रीत ५५ टक्के वाटा

मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीच्या सव्वा लाख जुडी, मेथीच्या एक लाख जुडींची आवक झाल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात कांदापातीच्या जुडीमागे तीन रुपये, शेपू आणि पुदिन्याच्या जुडीमागे एक रुपयांन वाढ झाली. घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे- कोथिंबीर- ८०० ते १५०० रुपये, मेथी- ४०० ते ८०० रुपये, शेपू- ६०० ते ८०० रुपये, कांदापात- ८०० ते १५०० रुपये, चाकवत- ४०० ते ७०० रुपये, करडई- ३०० ते ६०० रुपये, पुदिना- २०० ते ७०० रुपये, अंबाडी- ४०० ते ७०० रुपये, मुळा- ६०० ते १२०० रुपये, राजगिरा- ४०० ते ७०० रुपये, चुका- ४०० ते ८०० रुपये, चवळई- ३०० ते ६०० रुपये, पालक- ८०० ते १५०० रुपये, हरभरा गड्डी-४०० ते १००० रुपये

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for spring onion will increase in the month of margashirsha pune print news rbk 25 mrj