लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून घरबसल्या ऑनलाईन भाडेकरार करण्यासाठी पुणे – मुंबई शहरात सुरू केलेल्या २.० या प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत, तरी एक एप्रिलपासून राज्यात इतर जिल्ह्यात ही प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. मात्र, या किचकट प्रणालीतील त्रुटी दूर करून सुटसुटीत आणि सुरळीत होत नाही, तोपर्यंत अवलंब करू नये, अशी मागणी रियल इस्टेट एजंट असोसिएशतर्फे करण्यात आली आहे. संबंधित त्रुटी मुद्रांक शुल्क अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत.
राज्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा संपूर्ण कारभार ऑनलाईन पद्धतीने सुरू झाला आहे. त्यानुसार भाडेकरार करण्यासाठी विभागाने“लिव अँड लायसन्स’ आणि गहाणखतासाठी ‘नोटीस ऑफ इंटिमेशन’ ही ऑनलाईन २.० प्रणाली विकसित केली. पुणे जिल्ह्यात या प्रणालीचा अवलंब करण्यात येत असलात, तरी या प्रणालीत अनेक त्रुटीक अढाळून येत आहे. प्रथमत: ही प्रणाली अत्यंत किचकट असून सामान्य व्यक्तीला सहज वापर करणे शक्य नसल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी सांगितले.
शिंगवी म्हणाले, ‘पुणे शहरात आत्तापर्यंत साडेसात ते आठ लाख भाडेकरार या प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. घरबसल्या ऑनलाईन प्रणालीमुळे विभागाला ‘दस्त नोंदणी हाताळणी शुल्क’ (डाॅक्युमेंट हॅण्डलींग चार्जेस) मिळत नसल्याने शासनाकडून अतिरीक्त ३०० रुपये अतिरीक्त वेगवळ्या कराच्या माध्यमातून वसुल करण्या सुरूवात केली आहे. भाडेकरार करताना मालक, भाडेकरू आणि साक्षीदार यांच्या नोंदी आधार (तात्पुरता सांकेतिक सुरक्षा क्रमांक – ओटीपी) घेतले जात असल्याने यातून सायबर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नसून प्रणाली अत्यंत किचकट आहे.’
सामान्य नागरिकांना ऑनलाईन भाडेकरार २.० ही प्रणाली सहज वापरता येणार नसून याचा फटका महसुलावरही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत दस्त नोंदणी व मु्द्राक शुल्क विभागाकडे या प्रणालीतील जवळपास २५ ते ३० त्रुटी असलेले निवेदनाद्वारे कळवून एक एप्रिलपासून नागपूर आणि इतर ठिकाणी याचा अवलंब करू नये, असे निवेदन देण्यात आले आहे. अन्यथा यामुळे नागरिकांच्या बँक खात्याची सुरक्षाही धोक्यात येईल, असे निदर्शनास आणून देण्यात आले असल्याचे शिंगवी यांनी सांगितले.
- बँक खाते असल्याने आधारद्वारे ‘ओटीपी’ क्रमांक पद्धत बंद करावी- भाडेकरारापूर्वी मिळकतीची तपासणी करावी
- संपूर्ण मराठीत भाडेकराराचे स्वरूप करावे
- रखडलेले दस्त त्वरीत मिळविण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्ती करावी
- कुलमुखत्यार पत्रावर नोंदवण्यात येणारे भाडेकरराचे अधिकार तपासावे
- कुलमुखत्यारपत्र ऑनलाइन पद्धतीने सुरू करावे
- ग्रामीण भागात प्रणालीचा वेग कमी असून
- पैसे भरल्यानंतर ‘विशिष्ट कालावधी, तारीख बदलणे, सक्षम करावी
- भाडेकराराची दस्त दिनांक महिन्यातील दिवसांप्रमाणेच असावा
- ग्रामीण आणि शहरी भागासाठी नियमानुसार नोंदणी शुल्क आकारणी
- पोलीस पडताळणीतील माहिती सूचीक्रमांक दोनवर उपलब्ध करावी
- दस्त नोंदणीझाल्यानंतर २४ तासाद दस्त उपलब्ध व्हावा
- भाडेकराराची माहिती ई-सर्च या प्रणालीद्वारे सर्वसामान्यांना उपलब्ध करावी