‘मेहतर वाल्मिकी समाजाची आरक्षणातील आरक्षणाची मागणी योग्य असून या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य पाठपुरावा करेल’, असे मत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. तसेच या समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न पक्षातर्फे केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी सफाई कामगार सेल’ आणि ‘अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस’ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेहतर वाल्मिकी समाज व सफाई कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे शनिवारी पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
पुण्याच्या महापौर वैशाली बनकर, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुकर पिचड, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मण ढोबळे, राष्ट्रवादी सफाई कामगार सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव चांगरे, चरणसिंह टाक, डॉ. सुधाकरन पणीकर, सतीश लालबिगे, आमदार जयदेव गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘उपेक्षितांना आरक्षण असूनही अतिउपेक्षितांना त्यातील वाटा मिळत नाही. मेहतर वाल्मिकी समाजाची आरक्षणातील आरक्षणाची मागणी योग्य असून ती स्वीकृत करणे आवश्यक आहे. त्यासाठी पक्षातर्फे पाठपुरावा केला जाईल. ‘ठेकेदारी पद्धत बंद करून सफाई कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे’ आणि ‘माथाडी कामगारांप्रमाणे ‘सफाई कामगार कल्याण बोर्डा’ ची स्थापना करावी या मागण्याही संघटनेने केल्या आहेत. मात्र या दोन मागण्यांतील एका वेळी एकच मागणी करणे योग्य ठरेल. त्यानुसार याबद्दल पुनर्विचार व्हावा. हा समाज असंघटित असल्याने त्यांच्या सबलीकरणासाठी त्यांना प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न पक्षातर्फे केला जात आहे.’’