पुणे : अयोध्येमध्ये राममंदिरामध्ये प्रतिष्ठापना होत असताना पुणेकर रामभक्तांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘श्रीराम’ असा शिक्का असलेले केशरयुक्त पेढे चितळे बंधू मिठाईवाले यांनी आणले आहेत. रामभक्तांकडून या पेढ्यांना मागणी वाढत असून राममंदिर निर्मितीचा आनंद या श्रीराम पेढ्यांनी तोंड गोड करण्यासाठी आगामी दोन दिवस उपलब्ध असतील.
राममंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त सोमवारी देशभरात दिवाळी साजरी होणार आहे. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही ‘श्रीराम’ शिक्का असलेले केशरयुक्त पेढे आणले आहेत. दोन दिवसांपासून या पेढ्यांना मागणी वाढत आहे. आमची दुकाने आणि फ्रॅंचायजी अशा ३५ दालनांमध्ये या पेढ्यांना रामभक्तांकडून पसंती मिळत आहे.
राममंदिरातील राममूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा आनंद व्यक्त करण्यासाठी मिठाई, फरसाण अँड डेअरी असोसिएशनच्या वतीने तुळशीबाग गणपती मंदिराजवळ सोमवारी सकाळी दहा वाजता रामभक्तांना पेढ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
-संजय चितळे, अध्यक्ष, मिठाई, फरसाण अँड डेअरी असोसिएशन
२० ग्रॅम वजनाचा एक पेढा असून एक किलोमध्ये साधारणपणे ५० पेढे येतात. ७०० रुपये किलो असा श्रीराम पेढ्यांचा दर आहे. आणखी दोन दिवसांत या पेढ्यांना मागणी वाढण्याची शक्यता असून त्यादृष्टीने आम्ही पेढे निर्मितीची तयारी ठेवली आहे, अशी माहिती चितळे बंधू मिठाईवालेचे भागीदार संजय चितळे यांनी दिली.