पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीचे एकेकाळचे वैभव असलेल्या आणि सध्या उतरती कळा लागलेल्या िहदुस्थान अँटिबायोटिक्स (एच.ए.) कंपनीला तगविण्यासाठी या कंपनीची औषधे थेट पद्धतीने खरेदी करण्याची मागणी स्थायी समिती सदस्यांनी मंगळवारी केली.
स्थायी समितीची बैठक जगदीश शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये हाफकिन जैवऔषध निर्माण कंपनीतून सर्पदंशावरील लस थेट पद्धतीने खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. यासाठी ७५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सद्गुरू कदम यांनी एच. ए. कंपनी अन्य ठिकाणी औषधांचा पुरवठा करीत असताना महापालिका त्यांच्याकडून औषधांची खरेदी का करीत नाही, असा सवाल केला. त्याला महेश लांडगे यांनी पाठिंबा दिला. ही कंपनी डबघाईला आली असून कर्मचाऱ्यांना दोन-दोन महिने वेतन मिळत नाही. थेट औषधांच्या खरेदीमुळे अप्रत्यक्षपणे कामगारांना मदतच होईल. केंद्र सरकारचीच ही कंपनी असल्यामुळे औषधांबाबत कोणतीही शंका राहणार नाही. शहरामध्येच सहजरीत्या उपलब्ध होणाऱ्या औषधांमुळे इतर करांची बचत होऊ शकेल. थेट कंपनीकडूनच खरेदी केल्यामुळे औषधखरेदीतील टक्केवारीला आळा बसेल, अशी अपेक्षा या दोघांनी व्यक्त केली.
मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामराव गायकवाड म्हणाले, महापालिका औषध खरेदी प्रक्रियेमध्ये आजतागायत एच. ए. कंपनीने कधी सहभाग घेतला नव्हता. यापुढे त्यांचा विषय आल्यास त्या संदर्भात विचार करण्यात येईल. महापालिका आणि दक्षिण कोरियातील गुसनान शहरामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार अधिकाऱ्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याअंतर्गत यंदा कनिष्ठ अभियंता संतोष दुर्गे यांना पाठविण्यासाठी त्याचप्रमाणे महिलादिनानिमित्त कार्यक्रमांच्या आयोजनासाठी दोन लाख रुपयांच्या खर्चासाठी मंजुरी देण्यात आली.