पिंपरी पालिकेच्या विद्युत विभागात वर्षांनुवर्षे टक्केवारीचे ‘पंचामृत’ चाखणाऱ्या अधिकाऱ्यांना डॉ. श्रीकर परदेशी यांनी जाता-जाता ‘शॉक’ दिला. मात्र, यातून कसेही सुटू आणि पुन्हा ‘कामाला’ लागू, अशी खात्री काही अधिकारी देत आहेत. कोटय़वधींच्या या घोटाळ्याची फक्त चौकशी न होता ठोस कारवाई अपेक्षित असल्याचा सूर पालिका वर्तुळात आहे. विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनीही, चौकशी होणाऱ्या त्या १३ अभियंत्यांना निलंबित करावे आणि नंतर त्यांची चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.
विद्युत विभागातील कोटय़वधी रूपयांच्या कामातील घोटाळे व अनियमिततेचा ठपका ठेवून परदेशींनी कार्यकारी अभियंता मिलिंद कपिले, वासुदेव अवसरेंना निलंबित केले. तर, विकास अभियंता अशोक सुरगुडे, कार्यकारी अभियंता कैलास थोरात, संदेश चव्हाण, उपअभियंता माणिक चव्हाण, दिलीप धुमाळ, नितीन देशमुख, एकनाथ पाटील, कनिष्ठ अभियंता वासुदेव मांढरे, महेश कावळे, अकबर शेख, ए. एन. आडसुळे, प्रकाश कातोरे, दमयंती पवार यांच्या चौकशीचे आदेश दिले. मात्र, परदेशींची बदली झाल्याने सत्ताधारी ‘गॉडफादर’ नेत्यांच्या मदतीने यातून बाहेर पडू, अशी यातील काही अधिकाऱ्यांची भाषा आहे.
विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी मंगळवारी आयुक्त राजीव जाधव यांची भेट घेऊन ‘त्या’ १३ अधिकाऱ्यांना निलंबित करूनच त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. आवश्यकता नसताना कोटय़वधींची खरेदी करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हावी. करदात्या नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारण्याचे काम त्यांनी केले आहे. सुरगुडेंना तातडीने निलंबित केले पाहिजे, इतके त्यांचे उद्योग भयंकर आहेत. सुमी इलेक्ट्रॉनिक्सच्या निविदांची चौकशी झालेली नाही, त्यात अधिकाऱ्यांचे नातेवाईक व सांगलीतील नेत्यांचे हस्तक गुंतलेले आहेत. सत्ताधाऱ्यांचे पाठबळ लाभलेल्या अॅनमेक इलेक्ट्रॉनिक्सने घोटाळा करूनही त्यांच्यावर कारवाई नाही. क प्रभागात संगनमत करून पाच टक्के चढय़ा दराने निविदा भरण्यात आल्या, त्यात कोटय़वधींचा घोळ आहे, त्याची त्रयस्थ व्यक्तीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी नढेंनी आयुक्तांकडे केली आहे.
पिंपरीतील विद्युत घोटाळेबाजांवर कारवाईच हवी- विनोद नढे
विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनीही, चौकशी होणाऱ्या त्या १३ अभियंत्यांना निलंबित करावे आणि नंतर त्यांची चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.
First published on: 12-02-2014 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand to dismiss those 13 engineers by vinod nadhe