दिव्यांग बांधवांच्या प्रति केवळ सहानुभूतीची भावना न ठेवता त्यांना सहकार्याचा हात द्यावा, असे सांगत पालिका हद्दीतील अंध बांधवांसाठी शाळा तसेच रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, अशी मागणी प्रशासक राजेश पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
शहरात अंध बांधवांसाठी कार्यरत असणाऱ्या ‘आस्था सोशल फाउंडेशन’ या संस्थेतील अंध बांधवांनी आयुक्तांसमवेत रक्षाबंधन साजरे केले.अंधांनी तयार केलेल्या राख्यांचे या वेळी आयुक्तांसमोर सादरीकरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष पराग कुंकलोळ, माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत, प्रज्ञा खानोलकर, निकिता कदम, प्रा.सविता नाणेकर, दिपा मुरकुटे, रोहिनी वारे, उद्योजक अनिल भांगडिया आदी यावेळी उपस्थित होते.यासंदर्भात, आयुक्त पाटील म्हणाले, लहान मुलांमध्ये अपंगत्वाची, अंधत्वाची जाणीव निर्माण झाल्यास तातडीने पालकांनी लक्ष दिले पाहिजे.
नेत्रदानाची प्रक्रिया सुटसुटीत होण्यासाठी प्रयत्न अपेक्षित आहेत. नेत्रदानाची मोठी चळवळ उभी राहिली पाहिजे. यातूनच अंध बांधवांच्या, दिव्यांगांच्या समस्या काही प्रमाणात कमी होतील. या दृष्टीने सकारात्मक विचार केला जाईल.