लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : भरती प्रकरणात लाच मागितल्या प्रकरणी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील तत्कालीन लेफ्टनंट कर्नलविरुद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. तत्कालीन लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा आणि सुशांता नाहक यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर कट रचणे फसवणूक करणे तसेच भ्रष्टाचार विरोधी कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१६ नोव्हेंबर २०२१ रोजी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाच मागितल्याप्रकरणी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील तत्कालीन हवालदार सुशांत नाहक आणि नवीन कुमार यांच्यावर लष्करातील मल्टी टास्किंग भरती प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार सीबीआय विशेष न्यायालयाने नाहक आणि कुमार यांच्या मोबाइलमधील विदा विश्लेषण करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. मोबाइलद्वारे मिळविलेल्या माहितीमध्ये नाहक याने भरती प्रक्रियेत निवड झालेल्या आणि निवड न झालेल्या उमेदवारांकडे पैशाची मागणी केली असल्याचा प्रकार तपासात उघड झाला होता.
आणखी वाचा-पिंपरी: टँकर लॉबीचा वेढा; महापालिका प्रशासन म्हणतेय…
भरती प्रक्रियेत प्रतीक्षा यादीत असलेल्या एका उमेदवाराकडे दोन लाखांची लाचेची मागणी केली होती. त्यामुळे त्या उमेदवाराने सीबीआयकडे तक्रार दिली होती. तपासात सुशांता नाहक आणि कर्नल रायझादा यांनी भरती प्रक्रीयेत लाच मागितल्याचे सीबीआयने केलेल्या तपासात निष्पन्न केले. रायझादा यांनी निवड झालेल्या उमेदवरांच्या निवड प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचेही तपासात समोर आले. तसेच ग्रुप सी च्या भरती प्रक्रियेत देखील त्यांनी गैरप्रकार केल्याचे उघड झाले.
तपासात एका उमेदवाराकडून ८० हजार रूपये सुशांता नाहक याने बँक खात्यात जमा करून घेतले होते. तर त्यानंतर ७५ हजार रूपये रायझादा यांच्या बँकेच्या खात्यावर पाठविण्यात आले होते. त्यामुळे सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कट रचणे, फसवणूक, तसेच भ्रष्टाचाराच्या विविध कलमान्वये नव्याने गुन्हा दाखल केला आहे.