पोलीस आयुक्तांसमोर लघुउद्योजकांनी मांडलेला तक्रारींचा पाढा, पोलिसांच्या सहकार्याचे कौतुक करत त्यांच्या कार्यपध्दतीविषयी आमदारांनी सुनावलेले खडेबोल, उद्योजकांच्या समस्या सोडवण्याची ग्वाही देतानाच पोलीस खात्याच्या अडचणी मांडून त्यासाठी भरपूर मागण्या करणारे पोलीस आयुक्त अशी जुगलबंदी पिंपरीत पहावयास मिळाली.
लघुउद्योजक संघटना व भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याने संयुक्तपणे सुरू केलेल्या ‘इंडस्ट्रीयल टास्क फोर्स’ योजनेचे उद्घाटन पोळ यांनी केले. आमदार विलास लांडे, महापौर मोहिनी लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त सुरेश मेखला, उपायुक्त शहाजी उमाप, नगरसेवक सुरेश म्हेत्रे, संजय वाबळे, नितीन बनकर, संदीप बेलसरे आदी उपस्थित होते. लघुउद्योजकांचे प्रश्न ऐकण्यासाठी आलेल्या पोलीस आयुक्तांनी आपल्याच खात्याचे प्रश्न मांडून ते सोडवण्याचे साकडे लोकप्रतिनिधींना घातल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या होत्या.
पोलिसांचे वर्तन चांगले नाही, ते चोर सोडून सन्याशाला फाशी देतात, त्यांना लोकांशी नीट बोलण्याचे प्रशिक्षण द्या, अशा तक्रारी लघुउद्योजकांनी केल्या. आमदार लांडे यांनी पोलिसांचे सहकार्य मिळते, असे सांगत त्यांच्या अडचणीही मांडल्या. औद्योगिक परिसरातील वाढती गुन्हेगारी, झोपडय़ांमधील नागरिक विशेषत: महिला व लहान मुलांकडून होणाऱ्या चोऱ्या व मूग गिळून बसणारे पोलीस, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पोलीस ठाण्यासाठी जागा मंजूर करून दिली, त्याचे अद्याप पैसे भरण्यात आले नाहीत, याची आठवण करून देत पिंपरीसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असावे, अशी मागणीही लांडेंनी केली. पोलिसांच्या समस्यांची जाण असणारे आमदार असे म्हणत पोळ यांनी लांडेंच्या भाषणाचे कौतुक केले. लघुउद्योजकांच्या समस्यांची दखल घेत त्या सोडवण्याची ग्वाही देऊन झाल्यानंतर पोलीस खात्याच्या समस्यांची व मागण्यांची जंत्री पोळ यांनी मांडली. अपुरे कर्मचारी, वाढता पसारा, पोलिसांचे आरोग्य, अपुरा निधी, वाहतूक कोंडी असे अनेक मुद्दे पोळ यांनी मांडले. उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांसमवेत बैठक व्हावी, जेणेकरून अनेक प्रश्न मार्गी लागतील, असे लांडेंना सुचविले. प्राधिकरणाने पोलीस ठाण्यासाठी दिलेली जागा ‘बक्षीसपत्र’ म्हणून द्यावी, यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंतीही केली. आमदारांना मिळणाऱ्या निधीतील काही रक्कम पोलीस खात्यातील कामासाठी देण्याची मागणी केली. खासदार गजानन बाबर, आमदार अण्णा बनसोडेंनी यापूर्वीच तयारी दर्शवली. तुम्ही तीन आमदार एकत्रच असता. लांडे हरले म्हणून आढळराव खासदार झाले, त्यामुळे तेही तुमचे मित्रच आहेत. मोहिनीताई महापौर आहेत, त्यामुळे पालिकेचे सहकार्य मिळेलच. वडगाव शेरीचे पैलवान आमदार बापू पठारे आमच्या उमापांचे मामा आहेत. तुम्ही सर्वजण सहकार्य करणारे आहात, सरकार दरबारी आमचे प्रश्न मांडा व मार्गी लावा, असे ते खुमासदार पध्दतीने म्हणाले.

Story img Loader