पिंपरी : वाकड दत्त मंदिर रोड येथील ४५ मीटर रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत व्यावसायिक पत्राशेड, बांधकामांवर महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली. या कारवाईत १३७ पत्राशेड, १८ घरे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड दत्त मंदिर रोड येथील ४५ मीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. रुंदीकरणाच्या जागेवर अनधिकृत पत्राशेड व आरसीसी बांधकामे झाली होती. महापालिकेकडून १४ ऑगस्ट २०२४ पासून पत्राशेड, बांधकामधारकांना नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. ज्या जागामालकांनी नोटीस स्वीकारल्या नाहीत. त्या चिकटविण्यात आल्या. तीन जानेवारी २०२५ पासून अतिक्रमण वाहनामधून अनधिकृत बांधकाम व पत्राशेड काढून घेण्याबाबत जाहीर आवाहन करण्यात आले. सहा जानेवारीपासून रस्ता रुंदीकरणाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतरही नागरिकांनी अनधिकृत बांधकाम काढून घेण्याकडे दुर्लक्ष केल्याने महापालिकेने कारवाई केली.

हेही वाचा >>>बोगस संशोधनपत्रिकांचे पुन्हा पेव? प्रस्तावित नियमावलीत ‘यूजीसी केअर लिस्ट’चा अनुल्लेख

पहिल्या दिवशी ७० पत्राशेडवर कारवाई केली. दुसऱ्या दिवासापासून निवासी इमारतीवर कारवाई करण्यात आली. तीन दिवसांच्या कारवाईत १३७ व्यावसायिक अनधिकृत पत्राशेड, निवासी बैठी घरे, दोन व चार मजली घरे अशा १८ बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये अंदाजे ६२,००० चौरस मीटर क्षेत्र निष्कासित करण्यात आले. दोन जेसीबी, दोन पोकलेन मशीन आणि दोन ब्रेकर मशीनच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आल्याचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demolition of unauthorized constructions in wakad pune print news ggy 03 amy