आयपीएल मध्ये झालेल्या स्पॉटफिक्सिंगच्या विरोधात भाजपचे आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गहुंजे मैदानाच्या बाहेर निदर्शने करत खेळाडूंची बस काही मिनिटे अडवून धरली. पोलिसांनी तत्काळ आंदोलनकर्त्यांना बाजूला करत खेळाडूंच्या बसना रस्ता मोकळा करून दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे मैदानावर आयपीएलमधील पुणे वॉरिअर विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्या विरुद्ध रविवारी सामना होता. त्यासाठी दुपारी खेळाडूंच्या बस दुपारी मैदानाकडे जात असताना गहुंजे मैदानाच्या बाहेरील मुख्य प्रवेशद्वाराजवळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुपारी अडीचच्या सुमारास खेळाडूची बस अडविली. पुणे वॉरिअर्सच्या खेळाडूंची बस येताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्पॉट फिक्सिंगच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेल्या खेळाडूंचा निषेध केला. पोलिसांनी हस्तक्षेप करून ही बस मैदानात पोहोचवली. मात्र, दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या खेळाडूंची बस आंदोलनकर्त्यांनी काही मिनिटे अडविली. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना बाजूला काढून खेळाडूंच्या बसला रस्ता मोकळा करून दिला. याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी सांगितले, की स्पॉट फिक्सिंगच्या विरोधात आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यामध्ये पोलीस तपास करत असून बस अडविल्या असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील.