पुणे : शहरात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला असून, डेंग्यू आणि चिकुनगुन्याचा उद्रेक झाला आहे. शहरात महिनाभरात डेंग्यूचे ४९२ संशयित रुग्ण तर चिकुनगुन्याचे २६१ रुग्ण आढळले आहेत. चिकुनगुन्याच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच रुग्णांमध्ये वेगळी आणि तीव्र लक्षणे दिसून येत आहेत. यामुळे आरोग्यतज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात ६ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर कालावधीत डेंग्यूचे ४९२ संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील ३० निदान झालेले आहेत. या वर्षभरात डेंग्यूचे एकूण ४ हजार ५६ संशयित रुग्ण सापडले आहेत आणि त्यातील ३२४ निदान झालेले आहेत. चिकुनगुन्याचे महिनाभरात २६१ रुग्ण आढळले आहेत. चिकुनगुन्याची एकूण रुग्णसंख्या ३४७ वर पोहोचली आहे. डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. शहरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी सातत्याने सुरू आहे.

आणखी वाचा-पुणे: शाळकरी मुलाशी अश्लील कृत्य करणाऱ्या सुरक्षारक्षकाविरुद्ध गुन्हा

हवामानात सातत्याने बदल होत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्याच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. विशेषत: चिकुनगुन्याच्या रुग्णांमधील वाढ चिंताजनक आहे. कारण या रुग्णांमध्ये वेगळी आणि तीव्र लक्षणे दिसून येत आहेत. आधी या रुग्णांमध्ये ताप आणि सांधेदुखी ही लक्षणे दिसून येत होती. आता हृदयाच्या आवरणावर सूज आणि मेंदूज्वर यासारखी लक्षणे दिसून येत आहेत. आतापर्यंत अशी लक्षणे चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये दिसून येत नव्हती, असे डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. सचिन शिवनीटवार यांनी दिली.

चिकुनगुन्याची सामान्य लक्षणे

  • ताप, सांधेदुखी

चिकुनगुन्याची नवीन लक्षणे

  • हृदयाच्या आवरणाला सूज, मेंदूज्वर

आणखी वाचा-दुर्मीळ आजारामुळे कंबरेपासून खालचा भाग निकामी होऊनही १३ वर्षीय मुलगी पुन्हा उभी राहिली!

आजारापासून संरक्षणासाठी काय करावे…

  • आपली भोवतालचा परिसर स्वच्छ, कोरडा ठेवा.
  • घरात मच्छरदाणी, डास प्रतिबंधात्मक औषधांचा वापर करा.
  • नेहमी उकळून थंड केलेले पाणी प्या.
  • खाण्याआधी भाज्या, फळे स्वच्छ धुवून खा.
  • रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे शक्यतो टाळा.

६ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर रुग्णसंख्या

डेंग्यूचे संशयित रुग्ण – ४९२
डेंग्यूचे निदान झालेले रुग्ण – ३०
चिकुनगुन्याचे रुग्ण – २६१