डेंग्यूविषयक चाचण्यांसाठी कमी दर आकारले जावेत, असे आवाहन पालिका करत असली, तरी मुळात प्रत्येक डेंग्यूग्रस्ताच्या भारंभार अनावश्यक चाचण्या करणे आवश्यक आहे का, असा सवाल वैद्यकीय तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. गेल्या ३-४ महिन्यांमध्ये शहरात दिसणारी डेंग्यूची साथ ही ९० ते ९५ टक्के रुग्णांमध्ये गुंतागुंतीची नसल्याचे दिसत असून अशा गुंतागुंत नसलेल्या रुग्णांमध्ये ‘हिमोग्राम’ ही साधी रक्त चाचणी आणि रुग्णात दिसणारी लक्षणे याच्या साहाय्याने उपचार करता येतात, असे निरीक्षणही या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदवले.
‘जन आरोग्य अभियान’ या संघटनेचे डॉ. अनंत फडके म्हणाले, ‘‘डेंग्यूचे साधा डेंग्यू व गुंतागुंतीचा डेंग्यू असे दोन उपप्रकार आहेत. ९० टक्के रुग्ण साध्या डेंग्यूचे असून या प्रकारच्या डेंग्यूचे निदान अनेकदा होत नाही. पण त्याने काही बिघडत नाही. हे रुग्ण ५ ते ७ दिवसांत आपोआप बरे होतात. रुग्णाला गुंतागुंतीचा डेंग्यू झाला आहे का हे शोधणे महत्त्वाचे असते. त्यासाठी रुग्णाची नाडी आणि रक्तदाब रोज तपासायला हवा. तसेच हिमोग्राम ही रक्त चाचणी करायला हवी. रुग्णाचा प्लेटलेट काउंट दीड लाखांच्या खाली गेल्यास गुंतागुंतीचा डेंग्यू असल्याचे समजून पुढील काळजी घ्यावी. डेंग्यूचे नेमके निदान करण्यासाठीच्या महागडय़ा चाचण्यांचे निष्कर्ष काहीही आले, तरी उपचार बदलत नाहीत. या तपासण्यांसाठी सुमारे ६०० ते ८०० रुपये खर्च येतो. त्यामुळे सरसकट या चाचण्या करण्यात अर्थ नाही. बहुसंख्य रुग्णांमध्ये उपचार फक्त हिमोग्राम (सुमारे दीडशे रुपये) आणि रुग्णात दिसणारी लक्षणे यावरच अवलंबून असतात. त्यामुळे डेंग्यूचे नेमके निदान करण्यासाठीच्या चाचण्यांवरील खर्च टाळला पाहिजे.’’
डेंग्यूच्या बहुतांश रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचीही गरज नसते, असे डॉ. चंद्रशेखर फणसळकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘डेंग्यूचा ताप हा मुदतीच्या तापासारखाच साधारणपणे आठवडाभर राहतो. यात ‘अँटिबायोटिक्स’ (प्रतिजैविके) अजिबात लागत नाहीत. रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट्स डेंग्यूमध्ये कमी होत असून त्या विशिष्ट प्रमाणापेक्षा खाली गेल्यास रक्तस्राव होण्याची शक्यता असते. सामान्यत: शरीरात प्लेटलेट्सची संख्या दीड लाख ते साडेचार लाख (पर मायक्रोलीटर ऑफ ब्लड) एवढी असते. हा प्लेटलेट काउंट २० हजार इतका जरी झाला, तरी बहुतेक वेळा रक्तस्राव होत नाही. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला प्लेटलेट्स देण्याची गरज नाही. एखाद्या रुग्णाच्या प्लेटलेट्स झपाटय़ाने कमी होताना दिसल्यास त्यावर नजर ठेवण्यासाठी रक्ताची ‘हिमोग्राम’ ही तपासणी वारंवार करणे योग्य ठरते व गरज पडल्यास प्लेटलेट्स द्याव्या लागतात.’’
‘आजारात गुंतागुत असेल, तर यकृतावरील परिणाम तपासण्यासाठी ‘लिव्हर फंक्शन टेस्ट’ करावी लागते. पोटातील अवयवांना सूज येणे किंवा ‘डेंग्यू शॉक सिंड्रोम’मध्ये रक्तदाब कमी होऊन सर्वच अवयवांवर परिणाम होणे या प्रकारच्या गुंतागुंती सध्या खूप कमी रुग्णांमध्ये दिसत आहेत,’ असेही फणसळकर यांनी सांगितले.
डेंग्यू झाल्यास काय करणे योग्य –
– पूर्णपणे विश्रांती घेणे
– चोवीस तासांत तीन ते साडेतीन लिटर पातळ पदार्थ घेणे
– ताप आणि अंगदुखीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरॅसिटॅमॉलसारखे औषध घेणे
– रक्तस्राव झाल्यास उदा.- दात, हिरडय़ा, नाकातून रक्तस्राव होणे, लघवी लाल रंगाची होणे, त्वचेखाली रक्तस्राव होऊन लाल चट्टे उठणे अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त चाचणी करून योग्य उपचार घेणे
– अशक्तपणा आलेल्या प्रत्येक रुग्णाला सलाइनची गरज नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा