ऑक्टोबरचा शेवट जवळ येऊनही दिवसा उष्ण आणि दमट हवामान आणि रात्री थंडी हे वातावरण निवळलेले नाही. थंडी सुरू न झाल्यामुळे शहरात डेंग्यूचा फैलाव सुरूच आहे. चालू आठवडय़ात डेंग्यूचे २० रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे जानेवारीपासून आतापर्यंत आढळलेल्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये स्त्रियांपेक्षा पुरूषांची संख्या दुप्पट आहे.
जानेवारीपासून शहरात ४५१ जणांना डेंग्यू झाला असून ४ जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. श्याम सातपुते यांनी दिली. यात ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत ८८ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूच्या एकूण रुग्णांमध्ये ३०२ पुरूष रुग्ण असून स्त्री रुग्णांची संख्या १४९ आहे. डॉ. सातपुते म्हणाले, ‘‘पाऊस पडून गेल्यानंतरचे हवामान डासांच्या वाढीसाठी पोषक असते. थंडी सुरू झाल्यानंतर डासांचे प्रमाण कमी होऊन डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण कमी होईल. एखाद्या घरात डेंग्यूचा रुग्ण आढळल्यानंतर त्या जवळपासच्या भागात इतर नागरिकांना डेंग्यूची लक्षणे दिसत आहेत का, याची तपासणी पालिकेतर्फे केली जाते. तापी रुग्ण आढळल्यास त्याचीही डेंग्यूसाठी तपासणी केली जाते. तसेच त्या भागातील १०० घरांची औषध फवारणीही त्वरित केली जाते.ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचा जोर वाढत असल्यामुळे पालिकेने १ ते १५ ऑक्टोबर या काळात मोठय़ा प्रमाणावर डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी जनजागृती मोहीम राबवली. यात गृहप्रकल्प, शाळा अशा ठिकाणी जाऊन डेंग्यूसंबंधी माहिती देणे, चित्रपटगृहांमध्ये डेंग्यूविषयक स्लाईड शो प्रदर्शित करणे, माहितीपत्रके वाटणे अशा गोष्टींचा समावेश होता.’’
डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी डासांची उत्पत्ती टाळणे हेच अत्यावश्यक असून त्याबरोबरच डास चावणे टाळण्यासाठी अंगभर कपडे घालून वावरणे, उघडय़ावर न झोपणे, डास पळवणारी क्रीम्स अंगाला लावणे, अशा गोष्टींचाही फायदा होत असल्याचे डॉ. सातपुते यांनी सांगितले.
पाणी साठून त्यात डासांची पैदास झाल्याबद्दल पालिकेने २५ जणांवर खटले भरले आहेत. यातील १४ खटले या ऑक्टोबरमध्ये भरण्यात आले आहेत.
डेंग्यूच्या रुग्णांत पुरुषांची संख्या स्त्रीयांच्या दुप्पट! – पुण्यात आठवडय़ाभरात वीस जणांना लागण
चालू आठवडय़ात डेंग्यूचे २० रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे जानेवारीपासून आतापर्यंत आढळलेल्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये स्त्रियांपेक्षा पुरूषांची संख्या दुप्पट आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-10-2013 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue hits 451 peoples from january men ahead of women