बांधकामाच्या जागा डासांच्या वाढीसाठी चांगल्याच पोषक ठरत असल्याचे दिसून येत आहे. पालिकेने सुरू केलेल्या डेंग्यू प्रतिबंधक मोहिमेच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५७ बांधकामांना डासांची पैदास आढळल्याबद्दल किंवा डासांच्या वाढीला पोषक वातावरण आढळल्याबद्दल नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
 लांबलेला पाऊस, अधूनमधून दाटून येणारे मळभ आणि गेल्या काही दिवसांपासून दिसणारे विषम हवामान यांच्या परिणामामुळे शहरातील डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारीपासून आतापर्यंत शहरात डेंग्यूचे २७७ संशयित रुग्ण सापडले. यांपैकी तब्बल ९७ रुग्ण केवळ घोले रस्ता, हडपसर आणि धनकवडी या तीन प्रभागातील आहेत. घोले रस्ता परिसरात ३४, हडपसरमध्ये ३२ तर धनकवडीत डेंग्यूचे ३१ संशयित रुग्ण आढळले आहेत. याखालोखाल कोथरूड, विश्रामबाग वाडा आणि कोंढवा-वानवडी भागात डेंग्यू रुग्णांची संख्या अधिक आहे. भवानी पेठ भागात मात्र आतापर्यंत सर्वात कमी- ८ डेंग्यूचे संशयित रुग्ण सापडले आहेत. बिबवेवाडी आणि सहकारनगरमध्येही डेंग्यू रुग्णांची संख्या तुलनेने कमी आहे.
मे महिन्यात शहरात डेंग्यूचे ३४ रुग्ण सापडले होते. ही संख्या जूनमध्ये एकदम १३६ वर जाऊन पोहोचली. जूनमध्ये एका रुग्णाचा डेंग्यूमुळे मृत्यूही झाला. बांधकामाच्या ठिकाणी विखुरलेल्या पडीक वस्तूंमध्ये डासांची पैदास होण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे पालिकेने सुरू केलेल्या डेंग्यू प्रतिबंधक मोहिमेत बांधकामाच्या जागा तपासल्या जात आहेत. कीटक प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, ‘‘पावसाळ्याआधी आणि पावसाळ्यानंतरचा तसेच थांबून- थांबून पाऊस पडण्याचा काळ डासांच्या पैदाशीसाठी पोषक असल्याने या कालखंडात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसते. यंदा पाऊस लांबल्यामुळे खबरदारी म्हणून जुलैच्या पहिल्या आठवडय़ात विभागातर्फे डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांत विभागीय वैद्यकीय अधिकारी आणि क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या मोहिमेचे नेतृत्व करत असून त्यात डासांची पैदास आढळू शकेल अशा जागा तपासून पैदास आढळल्यास त्या ठिकाणी स्वच्छता तसेच डासअळीनाशक औषधांची फवारणी करण्यात येत आहे. घरोघरी फिरून तापी रुग्णांचे सर्वेक्षणही केले जात आहे.’’

Story img Loader