पुणे : पावसाळा सुरू झाल्यापासून डेंग्यूची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. आता शहरातील मंगळवार पेठेतील सदाआनंदनगरमध्ये डेंग्यूचे २० संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलत त्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
सदाआनंदनगरमध्ये २१ जूनपासून डेंग्यूचे २० रुग्ण आढळले आहेत. त्यातील ९ जणांना डेंग्यूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. एकाच भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. याबाबत महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, की सदाआनंदनगरमध्ये डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. या रुग्णांना कमला नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिसरात सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. डेंग्यूसदृश लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांवर तातडीने उपचार केले जात आहेत.
आणखी वाचा-आला पावसाळा, लहान मुलांचे आरोग्य सांभाळा! जाणून घ्या काय काळजी घ्यावी…
शहरात या महिन्यात डेंग्यूचे ६३ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील २१ या रुग्ण या आठवड्यात आढळले आहेत. या वर्षभरात शहरात डेंग्यूचे ३९३ संशयित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर चिकुनगुनियाचे ९ रुग्ण वर्षभरात आढळले आहेत. डासोत्पत्ती स्थाने आढळल्याप्रकरणी महापालिकेकडून ५६० निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांना नोटीस बजाविण्यात आली असून, १ लाख ६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सदाआनंदनगरमधील घरांची तपासणी आरोग्य विभागाने केली. तिथे नळाचे पिण्याचे पाणी चांगले असल्याचे आढळून आले. मात्र, इमारतीच्या टाक्यांमध्ये दूषित पाणी आढळून आले. याप्रकरणी संबंधितांना नोटीस बजावण्यात आली असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. -डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका