डेंग्यूग्रस्त रुग्णांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘प्लेटलेट्स’ या रक्तघटकाला असलेली मागणी शहरात गेल्या काही दिवसांत लक्षणीय रीत्या वाढली आहे. ऑगस्टमध्ये शहरात दर दिवशी डेंग्यूचे सरासरी १९ रुग्ण सापडत होते. सप्टेंबरमध्ये रुग्णांची ही संख्या प्रतिदिवशी ३६ अशी वाढली आहे. या वाढीचा ताण आता प्लेटलेट्स पुरवणाऱ्या रक्तपेढय़ांना जाणवू लागला आहे.
‘गेल्या १५ दिवसांपासून प्लेटलेट्सच्या खपात कमालीची वाढ झाली असून एका रक्तदान शिबिरात गोळा केलेले प्लेटलेट्स संपल्यानंतर पुढील शिबिर होईपर्यंतच्या मधल्या काळात प्लेटलेट्सचा तुटवडा जाणवण्याची शकता आहे,’ असे केईएम रुग्णालयाच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉ. आनंद चाफेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘रक्तदात्याच्या रक्तातून प्लेटलेट्स काढल्यावर त्या ५ दिवसांपर्यंतच साठवता येत असल्यामुळे पूर्वी आम्ही रक्तदानाच्या प्रत्येक शिबिरात ४० टक्केच रक्तदात्यांकडून प्लेटलेट्स काढत होतो. आता मात्र सर्व रक्तदात्यांकडून प्लेटलेट्स काढल्या, तरी त्या अपुऱ्याच पडतात. गेल्या पाच दिवसांत दररोज सरासरी २५ प्लेटलेट पिशव्यांची मागणी आम्ही पुरवतो आहोत. प्लेटलेट्सचा साठा संपण्याची स्थिती उद्भवल्यास पेढीतर्फे ठरलेल्या रक्तदात्यांना प्लेटलेट दान करण्याची विनंती केली जाते.’’
‘कर्करोगात केमोथेरपी घेणाऱ्या रुग्णांनाही प्लेटलेट्सची गरज भासते. मात्र कर्करुग्णांची प्लेटलेट्सची गरज कायम राहत असून त्यात मागणी अचानक वाढत नाही. सध्या मागणीत अचानक झालेली वाढ हे डेंग्यूचेच निदर्शक आहे,’ असेही चाफेकर यांनी सांगितले.
‘जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात प्लेटलेट्सच्या मागणीत हळूहळू वाढ होऊ लागली असून ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही मागणीत वाढ सुरूच आहे,’ अशी माहिती जनकल्याण रक्तपेढीचे प्रमुख डॉ. अतुल कुलकर्णी यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘सध्या आम्ही ‘रँडम डोनर प्लेटलेट्स’च्या दररोज २५ ते ३० पिशव्या पुरवतो. तर ‘सिंगल डोनर प्लेटलेट्स’च्या मागणीत एरवीपेक्षा दुपटीने वाढ झाली आहे. विषाणूजन्य ताप आणि डेंग्यू हेच या वाढीचे प्रमुख कारण आहे. आमच्याकडे प्लेटलेट्स दात्यांचा विशेष गट आहे. गेल्या महिन्यात झालेल्या प्लेटलेट दानात ४० टक्के वाटा नवीन प्लेटलेट दात्यांचा होता. त्यामुळे सध्या तरी प्लेटलेट्स नाहीत म्हणून कोणत्याही रुग्णाला परत पाठवावे लागत नाही. असे असले तरी प्लेटलेट दानासाठी अजून दाते पुढे येण्याची आवश्यकता आहे.’’
पूर्ण रक्तात (व्होल ब्लड) प्लेटलेट्सची संख्या खूप कमी असल्यामुळे अनेक रक्तदात्यांच्या रक्तातून एकत्र केलेल्या प्लेटलेट्सना ‘रँडम डोनर प्लेटलेट्स’ म्हणतात. तर एकाच दात्याच्या रक्तातून ‘अफेरेसिस’ या विशिष्ट तंत्राने वेगळ्या काढलेल्या प्लेटलेट्सना ‘सिंगल डोनर प्लेटलेट्स’ म्हटले जाते.
पालिकेच्या आकडेवारीनुसार डेंग्यू रुग्णांच्या संख्येतील वाढ –
महिना डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या
मे ०३४
जून २४९
जुलै ६३०
ऑगस्ट ५९१
सप्टेंबर ३९६
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा