नगर रस्ता भागात यंदा संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या इतर भागांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. नगर रस्ता परिसरात जानेवारीपासून आतापर्यंत २१ संशयित डेंग्यू रुग्ण सापडले आहेत. त्यापाठोपाठ १४ संशयित डेंग्यू रुग्णांसह वारजे आणि १३ संशयित रुग्णांसह कोथरूड या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
गतवर्षी घोले रस्ता, धनकवडी आणि वारज्यात संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या सातत्याने अधिक असल्याचे दिसले होते. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार या वर्षी जानेवारीपासून घोले रस्ता येथे १०, तर धनकवडीमध्ये ३ रुग्ण आढळले आहेत. सध्याची आकडेवारी पाहता धनकवडी, कोंढवा-वानवडी, बिबवेवाडी, सहकारनगर, भवानी पेठ, औंध आणि ढोले पाटील रस्त्यावर संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या कमी आहे.
पालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र ठाकूर म्हणाले, ‘नगर रस्ता भागात मोठय़ा प्रमाणावर शहरीकरण झाले असून, नजीकच असलेल्या वाघोली भागातील संशयित डेंग्यू रुग्णांची या ठिकाणी नोंद होते. संशयित डेंग्यू रुग्ण आढळण्याचे सध्याचे चित्र पाहता झोपडपट्टय़ांपेक्षा सोसायटय़ांमध्ये संशयित डेंग्यू रुग्ण अधिक आहेत. मे महिन्यात आम्ही झोपडपट्टय़ांमध्ये औषध फवारणी केली असून त्याचा परिणाम दिसून येत आहे. सोसायटय़ांकडून मात्र कीटक प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केले जात नाही. गच्ची, भंगार सामान, फ्लॉवरपॉटसारखी भांडी, लिफ्टचे डक्ट अशा ठिकाणी पाणी साठून डासांची वाढ होण्याची शक्यता असते.’ जानेवारीपासून आतापर्यंत डासांची पैदास होण्याजोग्या १४ हजार जागा (ब्रिडिंग स्पॉट) पालिकेस सापडल्या असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.
जानेवारीपासून आतापर्यंत पालिकेकडे एकूण १२३ संशयित डेंग्यू रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे ७५ संशयित डेंग्यू रुग्ण जुलै महिन्यात सापडले असून ऑगस्टमध्ये १० संशयित डेंग्यू रुग्ण आढळले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा