करोना संसर्गाने काहीशी उसंत घेतलेली असताना डेंग्यू या कीटकजन्य आजारामध्ये मात्र मोठीच वाढ पुणे शहरात सध्या दिसून येत आहे. तीन दिवसांपेक्षा जास्त काळ ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशा लक्षणांनी ग्रासलेल्या बहुतांश रुग्णांची डेंग्यू चाचणी केली असता त्यांना संसर्ग झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळेच विषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमध्ये भारतीय केंद्राची स्थापना

पुणे शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली

पुणे शहर आणि परिसरात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत डेंग्यू रुग्ण आढळण्याचे प्रमाण स्थिर असल्याचे दिसून येत आहे. पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अनुक्रमे ७४६, १०६२ आणि ९०२ संशयित रुग्ण आढळले. त्यांपैकी अनुक्रमे ६२, ७३ आणि ९६ रुग्णांना डेंग्यूचे निदान झाले आहे. डेंग्यूचा संसर्ग डासांपासून होतो. त्यामुळे डेंग्यूपासून बचावासाठी डासांच्या वाढीला प्रतिबंध करणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेकडून रुग्ण आढळलेल्या परिसरात नियमितपणे औषध फवारणी करण्यात येत आहे. तीव्र ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे असल्यास डेंग्यूची शक्यता अधिक असते. त्यामुळे रुग्णांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असेही डॉ. वावरे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा- गाजावाजा केलेल्या पिंपरीतील वाहनतळ योजनेचा बोजवारा; ठेकेदार कंपनीकडून काढता पाय

सहव्याधीग्रस्त रुग्णांनी खबरदारी घेणे आवश्यक

जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, शहराच्या मध्यवर्ती भागात नदी काठ, शिवाजीनगर, नारायण पेठ परिसरात डेंग्यूचे रुग्ण अधिक आहेत. माझ्याकडे बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या डेंग्यू रुग्णांमध्ये वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. दररोज किमान दोन ते तीन नवे रुग्ण येतात. अद्याप रुग्णालयात दाखल करण्याची गरज असलेले रुग्ण मी पाहिलेले नाहीत. मात्र, सहव्याधीग्रस्त रुग्णांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे, असेही डॉ. भोंडवे यांनी स्पष्ट केले.

योग्य उपचारांनंतर रुग्ण बरे

संजीवन रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. मुकुंद पेनूरकर म्हणाले, डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. डेंग्यूच्या बरोबरीने सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात गुंतागुंत निर्माण होत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य उपचारांनंतर रुग्ण बरेही होत आहेत, मात्र गाफील राहणे योग्य नसल्याचे डॉ. पेनुरकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा- महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी ८१४१ एकर जमीन राखीव; बाधितांना २६३५.०८ कोटींचे वाटप

काय काळजी घ्यावी?

  • घर आणि परिसरात स्वच्छ पाणी साठून राहणार नाही याकडे लक्ष द्या.
  • बागेतील झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साठू देऊ नका.
  • शोभेच्या झाडांमधील पाणी नियमित बदला.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका.
  • आहारात पाणी आणि भरपूर द्रव पदार्थांचा समावेश करा.